अमूलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे नाका येथे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा तंबाखूजन्य पदार्थ रोहा येथे विक्रीकरिता वाहतूक करीत असताना कारवाई करण्यात आली असून याबाबत रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगड शाखेकडील पोलीस हवालदार श्याम कराडे, पोलीस शिपाई मोरेश्वर ओमले यांना त्यांच्या बातमीदारकडून बातमी मिळाली की, मारुती सुझुकी डिजायर कार नंबर MH06/CD 5734 या कारमधून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा तंबाखूजन्य पदार्थ रोहा येथे विक्री विक्रीकरिता आणला जाणार आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखाप्रभारी बाळासाहेब खाडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के, पोलीस हवालदार सूर्यवंशी, श्याम कराडे, पोलीस नाईक अक्षय जाधव पोलीस, शिपाई मोरेश्वर ओमले, रुपेश पाटील यांचे पथक तयार करून छापा घालण्यासाठी वरसे नाका येथे सापळा रचण्यात आला.
सदर पथकाने मौजे वरसे येथे शनिवारी (दि. १९) पहाटे ५ वाजता सापळा रचून मारुती सुझुकी डिजायर कार नंबर एमएच ०६ सीडी ५७३४ हि ग्रे रंगाची कार थांबवून कारची झडती घेतली असता कारमध्ये २,८३,५००/- रुपये किंमतीचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा तंबाखूजन्य पदार्थ मिळून आला. कारमध्ये दिलीप मारुती पलंगे (रा. वरसे, ता. रोहा) निसार इस्माईल नाईक (रा. खालचा मोहल्ला ता. रोहा) हे दोघेजण मिळून आले.
गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कायदेशीर कारवाई करून २,८३,८००/- रुपये किमतीचा गुटखा, ८ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी डिजायर कार असा एकूण १० लाख ८३ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दिलीप मारुती पलंगे, निसार इस्माईल नाईक यांना ताब्यात घेण्यात येऊन त्यांचे विरुद्ध रोहा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं.136/2023 भारतीय दंड संहिता कलम 328, 34 सह अन्न व नागरी सुरक्षा मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वायंगणकर हे करीत आहेत.