• विरोध निवळला आणि भूखंडाचा वाद मिटला
• गावकऱ्यांचा बसस्थानक उभारणीचा सर्वानुमते ठराव
संजय प्रभाळे
बोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहराला बसस्थानक मिळावे यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष तब्बल दोन वर्ष सुरू होता. या चळवळीला अनेकदा विरोध झाला. मात्र, अखेर मंगळवारी ३० मे रोजी ग्रामसभेत सर्वानुमते समन्वयाने ठराव मंजूर करण्यात आला.
मागील दोन वर्षापासून असलेली बसस्थानकाची मागणी अनेक कारणामुळे पूर्ण होत नव्हती. यासाठी प्रशासनाकडून देखील वेळोवेळी सकारात्मकता असून देखील अनेक अडथळे निर्माण झाले. मात्र, शेवटी ग्रामस्थांकडून पाठपुरावा करण्यात आला. मंगळवारी बोर्ली शहराच्या जून्या बसस्थानक परिसरात सुसज्ज बसस्थानकाची उभारणीचा प्रश्न ग्रामसभेत तडीस निघाला. त्यामुळे आता बसस्थानकाची प्रतीक्षा संपणार आहे.
बोर्लीपंचतन शहरात बसस्थानकासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोकळ्या भूखंड जागेत भव्य इमारतीचा आराखडा तयार होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडून सुद्धा पुढाकार घेण्यात आला. या कामाचे लवकरच भूमिपूजन होणार असून आता शेकडो विद्यार्थी, दिघी पोर्ट, आदगाव, वेळास व प्रसिद्ध दिवेआगर पर्यटन स्थळ यांना भेटी देणारे पर्यटक तसेच दिघी व हरिहरेश्वर या दोन्ही ठिकाणाहून खरेदीकरिता बोर्लीपंचतनला येणाऱ्या प्रवाशांना लवकरच बसस्थानकाची सुविधा मिळेल. अशी आशा पंचक्रोशीतील नागरिक बाळगून आहेत.