• Fri. Feb 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा ग्रामीण रुग्णालय ‘व्हेंटिलेटर’वर; १२ वर्षांनंतरही आरोग्य व्यवस्था कोलमडलेलीच!

ByEditor

Feb 20, 2026

कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा; कंत्राटी डॉक्टरांचीही पाठ, नागरिकांमध्ये संतापाची लाट

म्हसळा | वैभव कळस
तालुक्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ३० खाटांच्या म्हसळा ग्रामीण रुग्णालयाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. रुग्णालयाच्या स्थापनेला १२ वर्षे उलटूनही अद्याप या ठिकाणी महत्त्वाच्या पदांची भरती झालेली नाही. शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रुग्णालयाचा डोलारा पूर्णपणे कोलमडला असून, गरिबांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रिक्त पदांचे ग्रहण सुटेना

२५ मे २०१४ रोजी मोठ्या थाटामाटात या रुग्णालयाचे उद्घाटन झाले. मात्र, तेव्हापासून आजतागायत वैद्यकीय अधीक्षक (वर्ग-१) हे महत्त्वाचे पद रिक्तच आहे. सध्या रुग्णालयात केवळ एकच कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, दोन पदे रिक्त आहेत. उर्वरित कामकाज रोहा येथून प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या डॉक्टरांच्या भरवशावर सुरू आहे.

रुग्णालयातील रिक्त पदांचा तपशील:

  • वैद्यकीय अधीक्षक (वर्ग-१) – १
  • दंतचिकित्सक (वर्ग-२) – १
  • क्ष-किरण तंत्रज्ञ – १
  • सहाय्यक अधीक्षक – १
  • कनिष्ठ लिपीक – १

कंत्राटी डॉक्टरांचीही साथ सुटली

रुग्णालयाचा भार पेलण्यासाठी तीन कंत्राटी डॉक्टर नियुक्त करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी दोन डॉक्टर उच्च शिक्षणासाठी नोकरी सोडून गेल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. अनुभवी डॉक्टरांच्या अभावामुळे प्रसूती सेवाही विस्कळीत झाली असून, गंभीर रुग्णांना वारंवार इतरत्र ‘रेफर’ करावे लागत आहे.

२०२५ वर्षाचा आढावा: रुग्णसंख्या मोठी, सुविधा तोकड्या

गेल्या वर्षभरात अपुऱ्या सुविधा असतानाही रुग्णालयाने मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा दिली आहे. पर्यटनामुळे वाढलेले अपघात आणि सर्पदंशाच्या घटना पाहता तज्ज्ञ डॉक्टरांची गरज अधिक भासत आहे.

  • ओपीडी (बाह्यरुग्ण): ३२,७६१
  • आयपीडी (दाखल रुग्ण): २,२३७
  • कुत्रा व विंचूदंश: ७०१ प्रकरणे
  • अपघात जखमी: ३४४
  • रेफर केलेले रुग्ण: ४४८

“कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप अनावर होत आहे. अनेकदा यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. शासनाने तातडीने येथे कायमस्वरूपी अधीक्षक आणि डॉक्टरांची नियुक्ती करावी, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल.”
— स्थानिक नागरिक, म्हसळा तालुका

नागरिकांची मागणी

म्हसळा ग्रामीण रुग्णालयात तत्काळ कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक आणि दोन वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. वाढत्या अपघातांची संख्या पाहता क्ष-किरण तंत्रज्ञाची उपलब्धता करणेही काळाची गरज बनली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!