ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शड्डू; विरोधकांसमोर कडवे आव्हान
म्हसळा | वैभव कळस
आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्यातील आंबेत, पानवे, साळविंडे, ताडाची वाडी आणि खारगाव (बु.) येथील विविध पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांनी रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मंत्री महोदयांच्या निवासस्थानी हा छोटेखानी परंतु महत्त्वपूर्ण सोहळा पार पडला. यामध्ये दत्तात्रेय कांबळे, दामोदर कांबळे, काशिनाथ कांबळे, गणेश म्हात्रे, राजश्री भायदे, कमलाकर भायदे, हरिचंद्र गाणेकर, दत्ता कांबळे, सुशील सुभेदार, गोपीनाथ सावंत, श्रीधर तांबे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी भगवा हाती धरला.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कोणताही मोठा ‘प्रचार प्रमुख’ चेहरा नसतानाही शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी प्रत्येक गणात दोन हजारांहून अधिक मते मिळवून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. सत्ताधारी पक्षाला कडवी झुंज दिल्यानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, “आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पूर्णपणे सज्ज आहोत,” असा विश्वास नवनियुक्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
“सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवू. विकासकामांच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन करणे हेच आमचे ध्येय आहे.”
— भरतशेठ गोगावले, मंत्री, महाराष्ट्र राज्य
या पक्ष प्रवेश सोहळ्याला शिवसेना नेते रवींद्र लाड, प्रभारी तालुकाप्रमुख बाबू बनकर, माजी तालुकाप्रमुख प्रसाद बोर्ले, महेश पाटील, उपतालुकाप्रमुख अमोल पेंढारी, विभागप्रमुख दीपेश जाधव, प्रभाकर चव्हाण, राजेंद्र सावंत, विलास बोळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
