श्रीवर्धन । अनिकेत मोहित
नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि स्वराज्यकालीन वैभवशाली इतिहासाची ओळख करून देण्यासाठी शिवरुद्र मर्दानी आखाडा श्रीवर्धन यांच्या वतीने शिवकालीन शस्त्र व नाणी प्रदर्शनाचे प्रभावी आयोजन करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी शाळा क्रमांक १ येथे पार पडलेल्या या प्रदर्शनाला नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमामागील मुख्य उद्देश तरुण पिढीला शिवकालीन युद्धनीती, शस्त्रांचे प्रकार व त्यांचा वापर तसेच त्या काळातील अर्थव्यवस्था आणि बाजार व्यवस्थेची माहिती देणे हा होता. प्राचीन चलनपद्धती, ऐतिहासिक नाणी आणि युद्धसामग्रीचे प्रत्यक्ष दर्शन घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल विशेष कुतूहल निर्माण झाले.
प्रदर्शनात मराठा ढोप, तेगा, खंडा, दांडपट्टा, विविध प्रकारचे भाले, सरपट्टा, पट्टीसा माडू, कट्यार, विजयनगरी कट्यार, तलवार, तोफ गोळे यांसारखी युद्धशस्त्रे तसेच शिवकालीन, मुघलकालीन, ब्रिटिशकालीन आणि जुन्या भारतीय नाण्यांचा दुर्मिळ संग्रह आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. प्रत्येक शस्त्राची रचना, युद्धातील उपयोग आणि ऐतिहासिक महत्त्व याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
स्वराज्य निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या शस्त्रांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा आणि अभिमानाची भावना निर्माण झाली. “ज्या शस्त्रांनी स्वराज्य उभे राहिले, त्या युद्धकलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे,” असे मत संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र गंगाराम ठाकूर यांनी व्यक्त केले.
या प्रदर्शनातून इतिहास केवळ पुस्तकापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून समजण्याची संधी मिळाल्याने उपस्थितांकडून उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
