• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेणमध्ये अनोळखी इसमाचा मृत्यू; खांद्यावर ‘बबीता’ आणि हातावर ‘त्रिशूळ’

ByEditor

Feb 21, 2026

अंगावरील गोंदलेल्या नावावरून ओळख पटविण्याचे आवाहन

पेण । विनायक पाटील
रायगड जिल्ह्यातील दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४५ ते ५० वर्ष वयोगटातील अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज व्यक्त केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास मौजे जिंतु आई मंदिराच्या मागील रोडवर, ता. पेण येथे हा इसम पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी तातडीने त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, पेण येथे दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. या इसमाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

मृत व्यक्तीचे वर्णन अंदाजे ४५ ते ५० वर्षे वय आणि ५ फूट ६ इंच उंची असे आहे. या व्यक्तीच्या शरीरावरील काही खुणांमुळे त्याची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. त्याच्या उजव्या खांद्यावर इंग्रजीमध्ये ‘BABITA’ (बबीता) असे नाव गोंदलेले असून, डाव्या हाताच्या दंडावर ‘ओम’ आणि त्यामध्ये ‘त्रिशूळ’ असे चित्र गोंदलेले आहे.

​दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ सकपाळ या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या वर्णनाच्या कोणत्याही व्यक्तीबाबत किंवा त्यांच्या नातेवाईकांबाबत काही माहिती मिळाल्यास, तात्काळ दादर सागरी पोलीस ठाणे किंवा तपास अधिकारी एकनाथ सकपाळ (भ्रमणध्वनी क्र. ८९७५३८१३११) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!