‘असा लोकनेता पुन्हा होणे नाही’; रोहेकरांकडून लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली
धाटाव । शशिकांत मोरे
“तो थाट, तो रुबाब आणि तो दरारा पुन्हा होणे नाही…” अशा शब्दांत बहुजन समाजाचे आधारवड आणि रायगडच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व स्व. भाईसाहेब पाशीलकर यांना शुक्रवारी आयोजित शोकसभेत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो चाहत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला, तेव्हा संपूर्ण सभागृह हेलावून गेले होते.
गेल्या शनिवारी (१४ फेब्रुवारी) भाईसाहेब पाशीलकर यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी समस्त रोहेकरांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

राजकीय व सामाजिक वाटचालीचा गौरव
शोकसभेत बोलताना माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पाशीलकर यांच्याशी असलेल्या कौटुंबिक नात्याला उजाळा दिला. “आजोबा दत्ताजीराव तटकरे यांच्यानंतर भाईसाहेबांनीच आम्हाला आजोबांची माया दिली. आमच्या कुटुंबाची आणि तटकरे साहेबांची काळजी घेणारे ते खंबीर व्यक्तिमत्व होते. त्यांचे कार्य पुस्तकरूपाने समोर यावे यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अॅड. राजीव साबळे यांनी जिल्हा परिषदेतील त्यांच्या खुमासदार डावपेचांच्या आठवणी सांगितल्या. “राजकारणात कडक दरारा असूनही मनात कोणतीही कटुता न ठेवणारे ते खरे लोकनेते होते,” असे त्यांनी नमूद केले. तर अॅड. मनोजकुमार शिंदे यांनी भाईसाहेबांना ‘गुरुतुल्य’ संबोधून त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले.

औद्योगिक आणि ग्रामीण विकासाचे शिल्पकार
रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष पी. पी. बारदेशकर यांनी औद्योगिक विकासातील भाईसाहेबांचे योगदान अधोरेखित केले. “धाटाव एमआयडीसीच्या अडचणीच्या काळातही उद्योग टिकले पाहिजेत आणि कामगारांचे हितही जपले पाहिजे, असा समन्वय साधणारा हा नेता होता,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. ज्येष्ठ कार्यकर्ते मारुतीराव खरीवले यांनी “कार्यकर्त्याचा चेक स्वतः घरी नेऊन देणारा हा बहुजनांचा देव होता,” असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
या शोकसभेला माजी आ. अनिकेत तटकरे, रोहा इंड असो.चे अध्यक्ष पी. पी. बारदेशकर, ॲड. राजीव साबळे, विजयराव मोरे, सहकारी मारुती खरीवले, सुरेश मगर, आप्पा देशमुख, ॲड. मनोज शिंदे, उद्देश वाडकर, अशोक धोत्रे, नंदकुमार म्हात्रे, स्नेहा अंबरे, उस्मान रोहेकर, नारायण धनवी, सुरेश महाबळे, अमित उकडे, महेश ठाकूर, राजेंद्र जैन, लिलाधर मोरे, सचिन शेडगे, सूर्यकांत मोरे यांसह राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, शेकडो चाहते लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले. शोकसभेच्या यशस्वीतेसाठी अप्पा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या असंख्य चाहत्यांनी विशेष परिश्रम घेतले. ‘समग्र भाईसाहेब’ अशा आशयाचे बॅनर आणि उपस्थितांची गर्दी ही त्यांच्या जनसंपर्काची मोठी पावती ठरली.
