रसायनाचे ड्रम आणि वाळलेले गवत यामुळे आगीचा भडका; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली
धाटाव । शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील ‘कॅलकेम इंडिया’ या गेल्या १० वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्यात शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठी जीवितहानी व वित्तहानी टळली आहे.
असुरक्षित भंगार तोडकाम ठरले कारणीभूत
मिळालेल्या माहितीनुसार, या बंद कारखान्यात सध्या भंगार काढण्याचे काम सुरू आहे. वेल्डिंग आणि कटिंग करत असताना उडालेल्या ठिणगीमुळे कारखान्यातील वाळलेले गवत आणि साचलेल्या कचऱ्याने पेट घेतला. या ठिकाणी रसायनाचे ड्रम आणि गोणी मोठ्या प्रमाणात पडून आहेत. जर ही आग या रसायनांपर्यंत पोहोचली असती, तर मोठा स्फोट होऊन अनर्थ घडला असता. मात्र, धाटाव औद्योगिक महामंडळाच्या अग्निशमन विभागाने शिताफीने आगीवर नियंत्रण मिळवले.
सुरक्षा आणि प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
धाटाव परिसरात अनेक बंद कारखाने असून तिथे भंगार व्यावसायिकांचा मोठा वावर आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांकडे कोणतीही सुरक्षा साधने नसतात. यापूर्वीही भंगार तोडताना मजुरांना प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, पावसाळ्यात येथील रसायन वाहून नदीपात्रात जाते, तर उन्हाळ्यात उष्णतेमुळे पेट घेते. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कामगार सुरक्षा विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
बेजबाबदार कारखानदार आणि नियम धाब्यावर बसवणारे भंगार व्यावसायिक यांच्यामुळे धाटावमधील गावांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर संबंधित कारखानदार आणि व्यावसायिकावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
“या ठिकाणी वेल्डिंग आणि कटिंगचे काम सुरू असताना ठिणगी पडून आग लागली. आम्ही तातडीने काम थांबवले आहे. आता परिसरातील गवत आणि कचरा पूर्णपणे साफ केल्यावरच पुढील काम सुरू केले जाईल.”
— विद्याधर बेडेकर
(व्यवस्थापक, साधना नायट्रोकेम लिमिटेड)
“आग लागल्याची माहिती मिळताच आमची टीम घटनास्थळी पोहोचली. गेट बंद असल्याने अडचणी आल्या, तरीही पाईपलाईन लांब नेऊन आम्ही ५ जणांनी शिताफीने ही आग नियंत्रणात आणली.”
— रामदास दिघे
(उप अग्निशमन अधिकारी, धाटाव)
