• Mon. Feb 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

केळवणे हायस्कूलमध्ये शिवजयंतीचा उत्साह; लेझीम पथक आणि शिवगर्जनांनी परिसर दुमदुमला

ByEditor

Feb 23, 2026

आदर्श राजाचा वारसा जपण्याचा मान्यवरांचा सूर; भव्य रॅलीद्वारे शिवरायांना अभिवादन

रायगड | प्रतिनिधी
को. ए. सो. हायस्कूल, केळवणे येथे १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांचा गजरात निघालेली रॅली, मुलींचे शिस्तबद्ध लेझीम पथक आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण केळवणे परिसर शिवमय झाला होता.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक आर. जी. पाटील यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे चेअरमन कोळी साहेब, सदस्य डॉ. शिवकर साहेब, आशिष घरत आणि ठाकूर साहेब उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्याची संकल्पना मांडत आजच्या पिढीने त्यांचे आदर्श अंगीकारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

यावर्षीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील विद्यार्थिनींचे लेझीम पथक ठरले. ज्येष्ठ शिक्षक अनमोल पगारे आणि देविदास गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या पथकाने सादर केलेल्या कौशल्याने सर्वांची मने जिंकली. शाळेपासून गावच्या बसस्थानकापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये या पथकाने शिस्तबद्ध सादरीकरण केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर ओघवत्या भाषेत विचार मांडले. तसेच ज्येष्ठ शिक्षक एम. एस. पाटील, ज्येष्ठ शिक्षिका के. टी. ठाकूर, भूमिका ठाकूर नवनीत कांबळे आणि निखिल मांडवकर यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ‘आदर्श राजा कसा असावा’, याचे उत्तम उदाहरण शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनीत कांबळे यांनी केले, तर संपूर्ण सोहळ्याचे छायाचित्रीकरण देविदास गांगुर्डे यांनी सांभाळले. शेवटी निखिल मांडवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी संतोष पाटील, मधुकर पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!