अलिबाग । क्रीडा प्रतिनिधी
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदानावर प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा रंगली. या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या गटात ओमकार वेश्वी, तर महिलांच्या गटात कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी संघाने विजेतेपद पटकाविले.
20 ते 22 फेब्रुवारी अशा तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 128 पुरुष, तर 32 महिला संघांनी सहभाग घेतला होता. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी जनरल सेक्रेटरी अॅड. आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजकांनी केलेले उत्कृष्ट नियोजन, पंचांची काटेकोर व निष्पक्ष कामगिरी तसेच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे स्पर्धेला भव्य यश लाभले. संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून खेळाडूंनीही उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवले.
स्पर्धेतील अंतिम सामन्यात पुरुषांच्या गटात ओमकार वेश्वी संघाने शिवाई बांधण संघाला पराभूत करून अजिंक्यपद पटकावले, त्यामुळे शिवाई बांधण संघ उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक जय बजरंग रोहा, तर चतुर्थ क्रमांक जयभवानी वाशी पेण संघाने मिळवला.

महिलांच्या गटात कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी विजेता संघाने विजेतेपद प्राप्त केले. उपविजेता पनवेल स्पोर्ट्स क्लब संघ, तर तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे ओमकार वेश्वी व दत्तात्रेय क्रीडा पनवेल संघाने मिळविला. या स्पर्धेच्या अनुषंगाने खेळाडू तसेच स्पर्धेसाठी मेहनत घेतलेल्या कबड्डीतील ज्येष्ठ कबड्डीपटू, मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास स्पर्धा संयोजन समितीचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे व वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी जनरल सेकेटरी अॅड. आस्वाद पाटील, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, रायगड जिल्हा राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह चित्राताई पाटील, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा संघटक प्रमुख प्रसाद भोईर, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, नगरसेविका प्रतिभा भोईर, स्पर्धा सचिव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शरद कदम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, प्रमोद म्हात्रे, कबड्डी असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष हिराचंद पाटील, प्रफुल्ल पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक जे. जे. पाटील, खजिनदार जगदीश पाटील, संजय मोकल, प्रथमेश पाटील, संदेश बैकर, जनार्दन पाटील, नरेश म्हात्रे, ओमकार पिंगळे, लक्ष्मण गावंड, अजिंक्य पाटील, पांडुरंग पाटील, संकेत पाटील, उल्हास पाटील, अनिल राऊत, माजी सरपंच चिंतामण भोईर, सी.एल. ठाकूर, अपूर्व ठाकूर, श्रीकुमार नायर यांच्यासह पदाधिकारी, प्रशिक्षक, कबड्डीप्रेमी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनसामान्यांच्या हृदयात घर करणारे आणि समाजकार्यातून लोकांचे जीवन उजळवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर हे नाव आज विश्वास, कार्यतत्परता आणि निःस्वार्थ सेवेचे प्रतीक बनले आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणालाच जीवनाचे ध्येय मानणाऱ्या या नेतृत्वाने गेली पाच दशके समाजसेवेची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवली आहे. आजही त्याच ऊर्जेने आणि तळमळीने ते समाजहितासाठी कार्यरत आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने कबड्डी असोसिएशन व पदाधिकाऱ्यांच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार व अभीष्टचिंतन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात त्यांचा गौरव करत त्यांच्या समाजसेवेच्या प्रवासाला सलाम केला.
कबड्डी हा आपल्या मातीतला अभिमानाचा खेळ आहे आणि या खेळाशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतूट नाते होते. याच भावनेतून या स्पर्धेत अजितदादांचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या कार्याची आणि खेळाप्रती असलेल्या निष्ठेची आठवण करून देत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या प्रेरणेने कबड्डीचा हा वारसा पुढे नेण्याचा संकल्प सर्वांनी केला.
