• Mon. Feb 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण: प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल

ByEditor

Feb 23, 2026

विवाह झाल्याच्या रागातून बदनामीचे कृत्य; कोप्रोली येथील आरोपी तरुणाचा पनवेल पोलिसांकडून शोध सुरू

उरण | विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यातील कोप्रोली येथील एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचे खासगी आणि अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेने दुसऱ्या तरुणाशी विवाह केल्याच्या रागातून आरोपीने हे कृत्य केले असून, पनवेल शहर पोलिसांनी आरोपी शिवम जाधव (२१) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मैत्रीचा गैरफायदा आणि ब्लॅकमेलिंग

मिळालेल्या माहितीनुसार, कोप्रोली येथे राहणारा आरोपी शिवम जाधव आणि पनवेलमधील २१ वर्षीय पीडित तरुणी यांची दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. या काळात शिवमने पीडितेच्या नकळत त्यांच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये करून ठेवले होते. वर्षभरापूर्वी काही कारणास्तव त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटले आणि पीडित तरुणीने दुसऱ्या तरुणाशी विवाह करून आपला संसार थाटला.

पीडितेचा विवाह झाल्याचे समजताच शिवमने सूडबुद्धीने तिला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. १६ फेब्रुवारी रोजी त्याने पीडितेचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. इतकेच नव्हे तर, त्याने हे व्हिडिओ पीडितेच्या परिचयातील व्यक्तींना व्हॉट्सॲपवर पाठवून तिची सामाजिक बदनामी केली. हा प्रकार निदर्शनास येताच पीडितेने तत्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

सदर अश्लील व्हिडिओ उरण परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पनवेल पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी शिवम जाधव फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!