• Mon. Mar 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या टेम्पोला भीषण आग; खांब ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

ByEditor

Mar 23, 2026

गादीने भरलेल्या टेम्पोने पुलावरच घेतला पेट; स्थानिक तरुणांच्या धाडसामुळे जीवितहानी टळली

कोलाड । विश्वास निकम
मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील खांब ग्रामपंचायतीसमोर असलेल्या पुलावर सोमवारी दुपारी एका धावत्या टेम्पोला अचानक भीषण आग लागली. गाद्यांनी भरलेला हा टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असतानाच, स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:४५ च्या सुमारास टेम्पो क्रमांक (MH 04 KF 1051) खांब गावाकडून कोलाडच्या दिशेने गाद्या घेऊन जात होता. खांब पुलावरून जात असताना अचानक टेम्पोच्या मागील बाजूने पेट घेतला. गाद्या ज्वलनशील असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली होती.

टेम्पोला आग लागल्याचे लक्षात येताच महामार्गावरील प्रवासी आणि खांब गावातील स्थानिक तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. मिळेल त्या साधनांनी आणि पाण्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीचा भडका उडण्यापूर्वीच नागरिकांनी ती आटोक्यात आणली, ज्यामुळे महामार्गावरील इतर वाहनांना पोहोचणारा धोका टळला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली, मात्र त्यापूर्वीच ग्रामस्थांच्या साहसामुळे आग पूर्णपणे विझवण्यात यश आले होते.

भरदुपारी पुलाच्या मध्यभागी टेम्पोने पेट घेतल्याने महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे गाडीचे मोठे नुकसान टळले आणि चालकही सुरक्षित बाहेर पडला. खांब ग्रामस्थांच्या या धाडसी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!