होर्मूझ सामुद्रधुनीतील संघर्षामुळे LPG पुरवठा विस्कळीत; गॅसचा काळाबाजार तेजीत, कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात
कोलाड । विश्वास निकम
इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून, त्याचे गंभीर परिणाम आता स्थानिक स्तरावर जाणवू लागले आहेत. होर्मूझची सामुद्रधूनी बंद झाल्याने भारताचा एलपीजी (LPG) पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, व्यावसायिक गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने कोलाड, सुकेळी आणि महामार्गावरील हॉटेल्स, टपऱ्या तसेच खाद्यपदार्थ स्टॉल्स बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
चुलीचा आधार, पण ग्राहकांची नाराजी
गॅस मिळत नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी नाईलाजास्तव पुन्हा ‘चुली’ पेटवल्या आहेत. मात्र, लाकडाची मागणी वाढल्याने त्याचेही दर वधारले आहेत. चुलीवर पदार्थ बनवण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याने ग्राहकांच्या ऑर्डर वेळेत पूर्ण करणे कठीण जात आहे. याचा थेट परिणाम व्यवसायावर होत असून, हॉटेलमधील कामगारांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत.
काळाबाजार आणि ग्राहकांची लूट
गॅसचा तुटवडा असतानाच दुसरीकडे गॅस एजन्सी आणि मध्यस्थांकडून लूट सुरू असल्याची चर्चा आहे. घरगुती गॅसची अधिकृत किंमत ९२८ रुपये असताना, ग्राहकांकडून ९४० ते ९५० रुपये उकळले जात आहेत. व्यावसायिक सिलेंडर चढ्या दराने विकले जात असून, गॅस एजन्सीचे कामगार खेड्यापाड्यात, आदिवासी वाड्यांवर जाऊन तुम्हाला आम्ही सबसिडी देऊन तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करून देऊ, तुम्ही गॅस घेऊ नका असे सांगून फसवणूक करीत असून तोच साठा ब्लॅक मार्केटमध्ये विकला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
“गेल्या २५-३० वर्षांपासून मुंबई-गोवा हायवेवर आमचे ‘विजय हॉटेल’ सुरळीत सुरू आहे. मात्र, गॅस टंचाईमुळे आता चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे. चुलीवर ऑर्डर्स पूर्ण करण्यास वेळ लागतो, ज्यामुळे व्यवसाय पूर्णपणे ढासळला आहे. जर लवकर गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर हॉटेल बंद करून उपासमारीची वेळ येईल.”
— प्रसाद उंबरे, (हॉटेल व्यावसायिक, सुकेळी)
