• Tue. Mar 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

टेलिग्राम ‘टास्क’ फसवणूक प्रकरणाचा छडा; म्हसळा पोलिसांकडून चौघांना अटक

ByEditor

Mar 24, 2026

१२ लाखांहून अधिक रकमेचा गंडा; तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना बेड्या

म्हसळा । वैभव कळस
घरबसल्या कामाचे आमिष दाखवून टेलिग्राम टास्कच्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात म्हसळा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपासाचा कौशल्याने वापर करत नालासोपारा येथून चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या फसवणुकीचा उलगडा झाला आहे.

म्हसळा येथील रहिवासी राहुल वसंत पोतदार यांना ५ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान टेलिग्रामवर काही ‘टास्क’ पूर्ण करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. सुरुवातीला विश्वास संपादन करून, त्यानंतर अधिक परताव्याच्या नावाखाली आरोपींनी फिर्यादीला १२ लाख ५३ हजार १५३ रुपयांना गंडा घातला. ही रक्कम वेगवेगळ्या यूपीआय (UPI) आणि आरटीजीएस (RTGS) खात्यांद्वारे वळवण्यात आली होती.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोतदार यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी मोबाईल क्रमांक आणि बँक खात्यांचा तांत्रिक मागोवा घेतला. या तपासाच्या आधारे १९ मार्च २०२६ रोजी पोलिसांनी नालासोपारा (पालघर) येथून रोहीत संजय गमरे (४०), रोशन आनंद सिंग (२५), अंकीत विरेंद्र विश्वकर्मा (२३), वृषभ बबन जाधव (२६) या चार आरोपींना अटक केली.

या प्रकरणात अनुज सिंग आणि जोरा राम (रा. राजस्थान) या अन्य दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. अटक करण्यात आलेले चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक शिवथरे आणि श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास पथकात सुरेंद्र गरड (पोलीस निरीक्षक, श्रीवर्धन), रविंद्र पारखे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हसळा), पो.ना. पालोदे, पो.शि. सागर चितारे आणि पो.शि. ठाकरे यांचा समावेश होता:

नागरिकांनी टेलिग्राम किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या ‘टास्क’ आधारित कामांच्या प्रलोभनाला बळी पडू नये. अनोळखी खात्यावर पैसे पाठवताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!