• Mon. Mar 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भजनाचा आनंद संतांच्या घरीच; ब्रह्मज्ञानात तो सुखद अनुभव नाही – ह.भ.प. अर्जुन महाराज मोटे पळशिकर

ByEditor

Mar 30, 2026

पिंगळसई येथील अखंड विश्वशांती हरिनाम सप्ताहात कीर्तनातून प्रबोधन; भाविकांची मोठी उपस्थिती

धाटाव | शशिकांत मोरे
“संत हे ज्ञान आणि भक्तीचे अक्षय भांडार आहेत. त्यांच्या सान्निध्यात मनाला जी शांती लाभते, ती अन्य कोठेही मिळत नाही. संतांच्या घरी होणाऱ्या भजनातील आनंद हा केवळ भक्तीतूनच घेता येतो, तो केवळ कोरड्या ब्रह्मज्ञानातून प्राप्त होऊ शकत नाही,” असे प्रतिपादन जालना येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अर्जुन महाराज मोटे पळशिकर यांनी केले.

रोहा तालुक्यातील धामणसई पंचक्रोशीच्या वतीने पिंगळसई येथे आयोजित ‘अखंड विश्वशांती हरिनाम सप्ताह’ व ‘श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या’ निमित्त आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते.

जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ‘हरिदासाचिये घरीं, मज उपजवा जन्मांतरीं…’ या अभंगावर निरूपण करताना महाराज म्हणाले की, “तुकोबांनी पांडुरंगाकडे वैकुंठाचे सुख न मागता प्रत्येक जन्मी हरिभक्तांच्या घरी जन्म मागितला आहे. संतांच्या चरणी लोटांगण घालताना मनात अहंकार नसावा आणि भगवंताच्या नामात तल्लीन होऊन नाचण्याची शक्ती मिळावी, हीच खरी भक्ती आहे. आज पिंगळसईच्या या पावन भूमीत मला आळंदीत असल्याचा भास होत आहे.”

आपल्या ओघवत्या वाणीतून महाराजांनी प्रयत्न, पुरुषार्थ, प्रार्थना आणि प्रतीक्षा या चार सूत्रांवर प्रकाश टाकला. “विकारांवर विजय मिळवणे हाच खरा पुरुषार्थ आहे,” असे सांगत त्यांनी मानवी जीवनातील पाप-पुण्य आणि कर्माचे महत्त्व विशद केले. यावेळी त्यांनी ‘पिंगळा महाद्वारी’ आणि ‘मल्हारीची वारी’ या रचनेवर उपस्थितांना डोलवायला लावले. विशेषतः चिमुकल्या अधिराज शिर्के याच्या आवाजातील सादरीकरणाचे त्यांनी कौतुक केले.

अनंतराव देशमुख यांच्या सौजन्याने आयोजित या कीर्तन सेवेसाठी धामणसई पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमात बाल वारकऱ्यांची वेशभूषा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. ह.भ.प. पळशिकर महाराज यांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजक, तरुण कार्यकर्ते, महिला मंडळ आणि साथसंगत करणाऱ्या टाळकरी-मृदंगमणी यांचे विशेष आभार मानले.

या हरिनाम सप्ताहामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, पंचक्रोशीतील वारकरी मंडळींच्या सक्रिय सहभागामुळे हा सोहळा आध्यात्मिक पर्वणीच ठरला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!