सेल्फी पॉईंट, संरक्षण भिंत अन् काँक्रीटीकरण रखडले; ‘राष्ट्रवादी’कडून सत्ताधारी शिंदे गटावर टीका
श्रीवर्धन | अनिकेत मोहित
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) वतीने श्रीवर्धन शहरात मोठ्या थाटामाटात करण्यात आलेली विविध विकासकामांची भूमिपूजने सध्या केवळ ‘दिखावा’ ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीला काळ लोटूनही प्रत्यक्षात एकाही कामाला सुरुवात न झाल्याने स्थानिक नागरिकांमधून प्रशासकीय दिरंगाई आणि राजकीय आश्वासनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाचे प्रकल्प अद्याप प्रलंबित
निवडणुकीपूर्वी शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि जनसुविधेसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने दांडा परिरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रस्तावित ‘सेल्फी पॉईंट’ची उभारणी, ओझाळे पाखाडी समुद्रकिनारी जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि जीवनेश्वर कोंड येथे पूर आणि समुद्राच्या भरतीपासून संरक्षण मिळावे यासाठी नदीलगतची संरक्षण भिंत या कामांचा समावेश होता.
हे प्रकल्प पर्यटन वाढीसाठी आणि स्थानिक सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचे मानले जात होते. मात्र, भूमिपूजनाचे नारळ फुटल्यानंतर संबंधित कंत्राटदार किंवा यंत्रणा घटनास्थळी फिरकल्याच नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
केवळ राजकारणासाठी भूमिपूजन?
निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी या कामांचा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, आता कामे रखडल्याने “भूमिपूजन फक्त मतांच्या राजकारणासाठी होते का?” असा सवाल उपस्थित होत आहे. जीवनेश्वर कोंड येथील संरक्षण भिंतीचे काम न झाल्याने पावसाळ्यात घरांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीची टीका
या प्रकरणावरून आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या श्रीवर्धन महिला शहर अध्यक्षा सौ. रुची बोरकर यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्या म्हणाल्या की, “निवडणुकीच्या काळात जनतेला मोठी आश्वासने देऊन धूमधडाक्यात भूमिपूजन केले जाते. मात्र, निवडणूक संपताच त्या कामांकडे पाठ फिरवली जाते. श्रीवर्धनमधील रखडलेली ही कामे हेच दर्शवतात की सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा केवळ राजकारणात रस आहे. प्रशासनाने आणि संबंधित पक्षाने तातडीने या कामांची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी.”
आता संबंधित शासकीय यंत्रणा आणि सत्ताधारी पक्ष यावर काय भूमिका घेतात आणि ही रखडलेली कामे कधी मार्गी लागतात, याकडे श्रीवर्धनकरांचे लक्ष लागले आहे.
