ॲड. मनीष पाटील यांचे झंझावाती अर्धशतक; ओम फाउंडेशन गोरेगावचा उपक्रम
रायगड | क्रीडा प्रतिनिधी
गोरेगाव येथील प्रसिद्ध मुमताज गार्डन मैदानावर, पत्रकार भारत गोरेगावकर यांच्या पुढाकाराने आणि ओम फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘प्रकाशझोतातील’ क्रिकेट स्पर्धेत रायगड-अलिबाग बार असोसिएशनच्या वकिलांच्या संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. अटीतटीच्या झालेल्या या प्रदर्शनीय सामन्यात वकिलांच्या संघाने रायगड पोलीस संघाचा २० धावांनी पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
रविवार, २९ मार्च रोजी झालेल्या या सामन्यात रायगड पोलीस संघाने नाणेफेक जिंकून वकिलांच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. निर्धारित ५ षटकांच्या या सामन्यात वकिलांच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. अॅड. मनीष पाटील यांनी मैदानाच्या चहूबाजूंनी फटकेबाजी करत केवळ १४ चेंडूंत ७ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने ५४ धावांची तुफानी खेळी केली. त्यांच्या या अर्धशतकी खेळीमुळे वकिलांच्या संघाने ४ गडी गमावून ७३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.
७४ धावांचा पाठलाग करताना रायगड पोलीस संघाला ५ षटकांत ३ गडी बाद ५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. वकिलांच्या संघाकडून अचूक गोलंदाजीचे प्रदर्शन घडले. माणगावचे सरकारी वकील अॅड. प्रशांत गावंड, अॅड. मनीष पाटील, अॅड. हर्षल पाटील, अॅड. विश्वेष पिकले आणि अॅड. समीर बंगाली यांनी शिस्तबद्ध मारा करत पोलीस संघाच्या धावगतीवर अंकुश ठेवला आणि संघाला २० धावांनी विजय मिळवून दिला.
सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अॅड. मनीष पाटील यांना ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले. माणगाव पोलीस ठाण्याचे पी.आय. निवृत्ती बोराडे, एपीआय श्रीकांत चिरवले, पत्रकार प्रफुल्ल पवार, भारत गोरेगावकर आणि पोलीस संघाचे खेळाडू ऋषिकेश साखळकर यांच्या हस्ते विजेत्या संघाला भव्य चषक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या दैदिप्यमान विजयाबद्दल रायगड बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी वकिलांच्या संघाचे विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.
