उरण । घनःश्याम कडू
मुंबई आणि नवी मुंबई यांच्यातील अंतर कमी करणारा अटल सेतू आता अलिबागपर्यंत विस्तारला जाणार असून, या प्रकल्पामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास केवळ दीड तासात पूर्ण होणार आहे. सध्या चार ते पाच तास लागणारा हा प्रवास मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याने प्रवासी तसेच पर्यटन क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.
सिडकोकडून या प्रकल्पासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. उलवे परिसरात सध्या सुमारे 7 किमी लांबीचा सहा लेन कोस्टल रोड उभारला जात असून, पुढील टप्प्यात हा मार्ग द्रोणागिरीमार्गे रेवस-करंजा खाडी पुलाशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. या जोडणीमुळे पुढे संपूर्ण कोस्टल कॉरिडॉर विकसित होणार आहे.या मार्गामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट व जलद जोडणी मिळणार आहे. त्यामुळे विमानतळापर्यंत पोहोचण्याचा वेळ कमी होऊन प्रवासी तसेच मालवाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे.
प्रकल्पात पर्यावरणीय बाबींचाही विचार करण्यात आला असून खारफुटी क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी काही भागात एलिव्हेटेड रस्ते उभारले जाणार आहेत. यामुळे पर्यावरणीय हानी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.या नव्या मार्गामुळे पाम बीच रोडसह इतर प्रमुख मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूपासून द्रोणागिरीपर्यंत सिग्नलमुक्त प्रवास होणार असल्याने 20 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
रेवस-करंजा खाडी पुलाशी जोडणी झाल्यानंतर नवी मुंबई ते अलिबाग आणि पुढे कोकण भाग थेट रस्त्याने जोडला जाईल. परिणामी फेरीबोटीवरील ताण कमी होऊन पर्यटनाला चालना मिळेल.या प्रकल्पासाठी सुमारे 1600 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून पुढील विस्तारासाठी 2500 ते 4000 कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोकणाच्या विकासाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.
