महाड । मिलिंद माने
तालुक्यातील बिरवाडी येथे एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय महिलेविरुद्ध महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बिरवाडी येथील एका घरात ही घटना घडली. भाग्यश्री नितीन गोधावडे (वय २५, रा. बापटनगर, बिरवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचे नाव आहे. आरोपी महिलेने पीडित अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केले. तसेच, हा प्रकार कोणाला सांगितल्यास पीडितेच्या आईला मारून टाकण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून २७ जून रोजी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवीन भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३५१(२), ७४, ७९ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) अधिनियम कलम ८ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरेगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रावडे आणि पोलीस शिपाई फाळके करत आहेत.
