• Mon. Jun 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

फी दरवाढ आणि नव्या अभ्यासक्रमाविरोधात कोलाडच्या ‘MPSS’ स्कूलचे पालक आक्रमक!

ByEditor

Jun 29, 2026

🔴 पालकांना पूर्वकल्पना न देता ‘LEAD’ अभ्यासक्रम लादल्याचा पालकांचा आरोप

🔴 भरमसाठ फी वाढ, गणवेशाची मक्तेदारी आणि अपुऱ्या सुविधांवरून प्रशासनाला धरले धारेवर

कोलाड । विश्वास निकम
रोहा तालुक्यातील कोलाड विभागातील नामांकित ‘एम.पी.एस.एस. इंग्लिश मीडियम स्कूल’मध्ये (MPSS) व्यवस्थापनाकडून अचानक लागू करण्यात आलेली फी दरवाढ आणि विद्यार्थ्यांवर सक्तीने लादण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमामुळे पालक वर्ग कमालीचा संतप्त झाला आहे. इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार न करता ‘लिड’ (LEAD) अभ्यासक्रमांतर्गत AI/JEE/NEET फाउंडेशन कोर्स लादण्यात आल्याचा आरोप करत, आक्रमक झालेल्या पालकांनी शाळा प्रशासनाला लेखी निवेदन देऊन ही दरवाढ आणि अभ्यासक्रम तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची भीती

कोलाड आंबेवाडी येथील एम.पी.एस.एस. स्कूलमध्ये सुरू करण्यात आलेला हा नवीन फाउंडेशन कोर्स लहान मुलांची मानसिकता आणि बौद्धिक क्षमता पाहता अत्यंत कठीण आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे. पालकांना विश्वासात न घेता ही वाढीव फी आणि अभ्यासक्रम लादण्यात आल्याने पालकांमध्ये तीव्र संताप आहे.

निवेदनातून पालकांनी उपस्थित केलेले गंभीर मुद्दे:

पालक संदीप माने व इतर उपस्थित पालकांनी शाळेच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत निवेदनात खालील मागण्या व प्रश्न उपस्थित केले आहेत:

  • गणवेशाची मक्तेदारी: शाळेचे युनिफॉर्म फक्त रोहा येथील ‘अमरदीप’ दुकानातच मिळतात आणि तिथे भरमसाठ किंमत वसूल केली जाते. या गणवेशाची किंमत शाळा ठरवते, दुकानदार की शिक्षण विभाग? हा युनिफॉर्म कोलाडमध्येच उपलब्ध करून देण्यात यावा.
  • अपुऱ्या पायाभूत सुविधा: विद्यार्थ्यांसाठी फिल्टरच्या पिण्याच्या पाण्याची सोय आहे का? मुला-मुलींची प्रसाधने (बाथरुम) स्वच्छ आणि सुरक्षित आहेत का?
  • पालकांसाठी शेड नाही: ऊन, वारा, पावसात पाल्यांना घेण्यासाठी येणाऱ्या पालकांसाठी शाळेबाहेर उभे राहण्यासाठी साधी शेडही उपलब्ध नाही.
  • पारदर्शकतेचा अभाव: पालकांना पुस्तकांच्या मूळ किमतीची अधिकृत पावती दिली जात नाही, ती मिळावी. तसेच शाळेत खेळताना विद्यार्थी जखमी झाल्यास प्रथमोपचाराची काय व्यवस्था आहे?

‘त्या’ दुकानातच युनिफॉर्म का? पालकांचा सवाल

या आंदोलनाप्रसंगी मनोहर अंबाजी महाबळे, मिलिंद गोपाळ पवार, संजय कुर्ले, संदीप माने, शरद सानप, दीपक चंद्रकांत बेटकर, संदीप गोळे, अजय परदेशी, उमेश केदार, सतीश मणके, मंगेश भगत, नागेश सानप, किशोर पानसरे, प्राची निलेश गायकवाड, देवयानी महाबळे, वेदिका मालुसरे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

शाळा प्रशासनाची भूमिका:

“सुरवातीच्या काळात पालकांच्या सभेत या फाउंडेशन कोर्सचा डेमो दाखवण्यात आला होता. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता व प्रगती व्हावी, याच उद्देशाने ‘LEAD’ अभ्यासक्रम सुरू केला आहे. फी वाढही पूर्वी झालेल्या पालक सभेतील निर्णयानुसारच आहे. पालकांनी निवेदनात नमूद केलेल्या बहुतांश सुविधा शाळेत उत्तम दर्जेदार आहेत, तरीही जिथे काही अभाव असेल त्यात सुधारणा केली जाईल. मात्र, जर पालक हा अभ्यासक्रम रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम असतील, तर पुढील वर्षापासून हा कोर्स बंद केला जाईल. तसेच वाढीव फी संदर्भात संचालक मंडळाशी चर्चा करून योग्य तो पर्यायी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.”
-वैशाली सुनील महाडिक (मुख्याध्यापिका, MPSS स्कूल)

शाळा प्रशासनाने सामोपचाराने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असले, तरी पालकांचा संताप पाहता व्यवस्थापन फी वाढीबाबत काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण कोलाड परिसराचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!