माणगाव । सलीम शेख
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील भाले ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी प्रस्तावित बल्क ड्रग पार्क आणि केमिकल उद्योगांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण गावात प्रदूषणकारी केमिकल झोन होऊ देणार नाही,” असा एकमुखी निर्धार करत ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात कायदेशीर ठराव मंजूर केला आहे. प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
आश्वासनांचा भंग; शेतकऱ्यांची फसवणूक?
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (DMIC) अंतर्गत या भागात जमिनी संपादित करताना “येथे केवळ इंजिनिअरिंग कंपन्याच येतील, प्रदूषणकारी रासायनिक उद्योग येणार नाहीत,” असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, आता याच परिसरात बल्क ड्रग पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये फसवणुकीची भावना असून संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामसभेत एकमुखी ठराव
भाले ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भाले, जावठे, बोंडशेत आणि कांदळगाव खुर्द या गावांतील शेतकरी, स्थानिक नागरिक आणि मुंबईत वास्तव्यास असलेले ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते. आयोजित सर्वसाधारण सभेत सर्वांनी मिळून या प्रकल्पाला ठाम विरोध दर्शवणारा ठराव मंजूर केला.
“रोजगाराच्या संधी निर्माण होणे ही स्वागतार्ह बाब असली तरी त्या बदल्यात परिसरातील पर्यावरण, शेती, पिण्याचे पाणी आणि नागरिकांच्या आरोग्याचा बळी दिला जाऊ शकत नाही. विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे जीवनच धोक्यात येणार असेल, तर अशा विकासाला आमचा ठाम विरोध राहील.” — ग्रामस्थ, भाले
१.१४ लाख रोजगाराचा दावा, पण आरोग्याचं काय?
‘दिल्ली-मुंबई कॉरिडॉर’ अंतर्गत दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्राच्या विकासामुळे सुमारे ६,०५६ एकर क्षेत्रात ३८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन १.१४ लाख रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, जर या परिसरात फार्मास्युटिकल किंवा बल्क ड्रग उद्योग आले, तर त्यातून निर्माण होणारे रासायनिक प्रदूषण स्थानिकांच्या मुळावर उठेल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांनी अधोरेखित केलेले संभाव्य धोके:
- जलप्रदूषण: औषधनिर्मिती प्रक्रियेतील रासायनिक सांडपाण्यामुळे नद्या, नाले, पाणवठे आणि समुद्र प्रदूषित होऊन जलचर सृष्टी धोक्यात येईल.
- जमीन नापीक होणे: रासायनिक घनकचरा आणि सांडपाणी जमिनीत मुरल्यास परिसरातील सुपीक शेती कायमची नापीक होईल.
- वायू प्रदूषण व आजार: कारखान्यांच्या विषारी वायूंमुळे श्वसनाचे आजार, त्वचारोग आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
- अँटीबायोटिक रेझिस्टन्स: प्रतिजैविक औषधांच्या उत्पादनातून होणाऱ्या प्रदूषणामुळे मानवी शरीरात औषधांना दाद न देणारे घातक जंतू (Antibiotic Resistance) तयार होण्याचा मोठा धोका आहे.
‘हा पुढील पिढ्यांच्या अस्तित्वाचा लढा’
“हा केवळ जमिनीचा प्रश्न नसून पुढील पिढ्यांच्या आरोग्याचा, पर्यावरणाच्या संरक्षणाचा आणि शेतीच्या अस्तित्वाचा लढा आहे. त्यामुळे हा संघर्ष शेवटपर्यंत सुरू राहील,” असा निर्धार सभेच्या शेवटी ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या सभेला भाले ग्रामपंचायत हद्दीतील प्रमुख नेते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी, महिला, युवक आणि मुंबईस्थित चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता यावर शासन आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
