• Sat. Jun 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन: मौजे पुनिर येथे सार्वजनिक विहीर कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र पाणीप्रश्न गंभीर

ByEditor

Jun 27, 2026

श्रीवर्धन । संदेश घोलप
तालुक्यातील मौजे पुनिर येथे ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली सार्वजनिक विहीर शनिवार, पहाटे ५.३० ते ६.०० वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुदैवाने ही दुर्घटना पहाटेच्या वेळी घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, विहीर पूर्णपणे खचल्याने संपूर्ण गावात तीव्र नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुर्लक्षाचा फटका; ऐतिहासिक विहीर निकामी

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या विहिरीच्या आतील बांधकामाचे दगड निखळत असल्याचे निदर्शनास येत होते. या धोक्याकडे वेळेत लक्ष न दिले गेल्याने अखेर आज पहाटे विहिरीचा काठ आणि आतील बांधकाम एकाच वेळी कोसळले. अनेक वर्षांपासून गावाच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार असलेली ही सार्वजनिक विहीर आता पूर्णपणे निकामी झाली आहे.

ग्रामपंचायत चिखलप प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना

घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत चिखलप प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. भविष्यात लहान मुले, नागरिक किंवा पाळीव जनावरे विहिरीत पडून कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने विहिरीच्या सभोवताली तारेचे कुंपण (फेन्सिंग) घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

“प्रशासनाने केवळ तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी न करता, गावाचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी नवीन विहीर उभारावी किंवा पर्यायी कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी.” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सखोल चौकशीची मागणी

या विहिरीवर गावातील अनेक कुटुंबांची दैनंदिन गुजराण अवलंबून होती. विहीर कोसळल्याने आता ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होणार आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित विभागाने या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून विहीर कोसळण्यामागील कारणांचा शोध घ्यावा आणि दोषींवर, तसेच निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!