सप्तनद्यांच्या जलाचा आणि दुधाचा जलाभिषेक; ढोल-ताशांच्या गजरात अवतरला शिवकाळ
रायगडावरील पाण्याची समस्या मिटवण्यासाठी ‘गुरुत्वाकर्षण आधारित पाणीपुरवठा योजने’ला तातडीने मान्यता
किल्ले रायगड । मिलिंद माने
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज तिथीनुसार ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि शिवभक्तांच्या अलोट गर्दीत साजरा झाला. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. “दुर्गराज रायगड आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही,” अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मंत्रघोषात जलाभिषेक; गडावर शिवकाळ अवतरला
पावसाचे वातावरण आणि काहीशी ओढ असली तरी गडावर शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पहाटे राजसदरेवर मंत्रघोषात सोहळ्याला सुरुवात झाली. शिवछत्रपतींच्या भव्य मूर्तीला सप्त नद्यांचे पाणी आणि दुधाने अभिषेक घालण्यात आला. पारंपरिक वेषातील शिवभक्त, ढोल-ताशांचा गजर, शाहिरांची डफावरची थाप आणि चित्तथरारक मर्दानी खेळांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण गड परिसरात शिवकालीन वातावरण जिवंत झाले होते. ‘प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर…’ या जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता.

रायगडासाठी महत्त्वाच्या घोषणा
याप्रसंगी शिवभक्तांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी एक मोठी घोषणा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, ‘गुरुत्वाकर्षण आधारित पाणीपुरवठा योजने’स तातडीने मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
“किल्ले रायगड हा आपला स्वाभिमान आणि ऊर्जेचा स्रोत आहे. ३५० वर्षांपूर्वी याच ठिकाणी एका नव्या युगाची पहाट झाली, ज्याने स्वराज्य आणि स्वधर्म जागृत केला. यंदा पाऊस लांबला असला, तरी आमचे महायुती सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पाचाडच्या ‘शिवसृष्टी’साठी निधी वाढवण्याची मागणी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी रायगड किल्ला आणि पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि पुनरुज्जीवनासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली. पाचाड येथे उभारण्यात येणाऱ्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पासाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला असून, सुमारे ८० ते ८५ एकर जागा संपादित करण्यात आली आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पास अंतिम मंजुरी देऊन निधीत आणखी वाढ करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली. तसेच किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्तीत केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून (ASI) येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.

मान्यवरांची मांदियाळी
या ऐतिहासिक सोहळ्याला गोव्याचे मंत्री सुहास देसाई, राज्याचे रोहयो मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर रवी लांडगे, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार, कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार, उपाध्यक्ष संकेत वडके यांच्यासह लाखो शिवभक्त उपस्थित होते.
