• Sat. Jun 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावच्या नगरसेविका ममता थोरे एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

ByEditor

Jun 27, 2026

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच वकिलीचे शिक्षण; आई-वडिलांचे मार्गदर्शन ठरले उपयुक्त

माणगाव | सलीम शेख

माणगाव नगरपंचायतीच्या कार्यतत्पर नगरसेविका ममता थोरे-शेट यांनी ‘एलएलबी’ (कायद्याची पदवी) परीक्षेत प्रथम श्रेणीत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

​ममता थोरे-शेट यांचे वकील होण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणगाव येथील ‘अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयातून’ कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण केले. नुकत्याच लागलेल्या निकालात त्यांनी प्रथम श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण होऊन वकील होण्याचा बहुमान मिळवला आहे.

​ममता थोरे या गेल्या साडेचार वर्षांपासून माणगाव नगरपंचायतीमध्ये वॉर्ड क्रमांक ४ मधून नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी वॉर्डातील विकासकामांना नेहमीच प्राधान्य दिले असून, सामाजिक कार्यात आणि गुणवंतांच्या गौरवात त्या नेहमीच अग्रसेर असतात. त्यांना असलेल्या समाजसेवेच्या प्रचंड आवडीमुळे आणि आता कायद्याची पदवी मिळाल्यामुळे बहुजन समाजातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. न्यायालयात सर्वसामान्यांची बाजू सक्षमपणे मांडून त्या आपल्या अशिलांना नक्कीच न्याय मिळवून देतील, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

वडिलांच्या संघर्षाची प्रेरणा आणि आई-वडिलांचे संस्कार हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली!

“माझ्या वडिलांनी आयुष्यभर तळागाळातील बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी केलेला संघर्ष मी अगदी जवळून पाहिला आहे. अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवणे आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणे, हीच त्यांची शिकवण माझ्यासाठी प्रेरणास्थान ठरली. समाजातील प्रत्येक वंचित, दुर्बल आणि गरजू व्यक्तीच्या न्यायहक्कांसाठी सक्षमपणे उभे राहता यावे, या ध्येयाने प्रेरित होऊनच मी ही मेहनत घेतली. आज प्राप्त झालेले हे यश केवळ माझे नसून, माझ्या आई-वडिलांच्या विचारांचे, संस्कारांचे आणि मार्गदर्शनाचे फलित आहे.”

— अ‍ॅड. ममता थोरे-शेट (नगरसेविका, माणगाव)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!