कर्जत । गणेश पवार
पत्रकारांना कथित जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कर्जत प्रेस क्लबने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या संदर्भात कर्जत प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) राहुल गायकवाड, कर्जत पोलीस ठाणे आणि नेरळ पोलीस ठाणे येथे निवेदन सादर केले. या निवेदनात संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कर्जत प्रेस क्लबच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात, पत्रकारांना धमकावणे, त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृत्यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. पत्रकार हे समाजात निर्भीडपणे काम करत असताना अशा धमक्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे असल्याचे मत उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केले.
यावेळी रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संजय मोहिते, सचिव दरवेश पालकर, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार, कार्याध्यक्ष विलास श्रीखंडे, सचिव अजय गायकवाड, माजी अध्यक्ष विद्यानंद ओव्हळ, ज्येष्ठ पत्रकार अण्णा विजय मांडे, जयवंत हाबळे, गणेश पुरवंत, ज्ञानेश्वर बागडे, गणेश मते, विपुल माली, श्रीकांत हाबळे, संजय अभंगे यांच्यासह अनेक पत्रकार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
