• Fri. Jun 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे श्रीवर्धन दौऱ्यावर; विकासकामांची पाहणी व ‘जनता संवाद’ कार्यक्रम

ByEditor

Jun 26, 2026

श्रीवर्धन । अनिकेत मोहित
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज श्रीवर्धन तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावत विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या.

मंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन येथील माळी समाज सभागृह, दाबक पाखाडी येथे आयोजित तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत शेतीविषयक विविध विषयांचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यानंतर त्यांनी श्रीवर्धन परिसरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांची पाहणी केली. यामध्ये साकारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक पेशवे स्मारकाच्या कामाची पाहणी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या कामाचा आढावा तसेच श्रीवर्धन समुद्रकिनारा परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

तसेच श्रीवर्धन येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दौऱ्याच्या शेवटी श्रीवर्धन येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित ‘जनता संवाद’ कार्यक्रमातून मंत्री आदिती तटकरे यांनी नागरिक, महिला आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या समस्या व मागण्या ऐकून घेतल्या. विविध स्थानिक प्रश्नांवर संबंधित प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या दौऱ्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, नागरिकांच्या विविध प्रश्नांवर प्रशासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!