• Fri. Jun 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खा. संजय दिना पाटील यांच्या धमकी प्रकरणाचा रोहा प्रेस क्लबकडून तीव्र निषेध; कारवाईसाठी पोलिसांना निवेदन

ByEditor

Jun 26, 2026

धाटाव । शशिकांत मोरे
पत्रकारांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेले खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा रोहा प्रेस क्लबच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व रायगड प्रेस क्लबच्या आवाहनानुसार, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा प्रेस क्लबने रोहा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांवरील अशा प्रकारच्या धमक्या लोकशाही आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर थेट आघात करणाऱ्या असून संबंधितांवर कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे.

शुक्रवारी सायंकाळी रोहा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी रोहा पोलीस प्रशासनाला हे निवेदन सादर केले. पत्रकारांशी बोलताना लोकप्रतिनिधींकडून वापरण्यात आलेली भाषा, शिवीगाळ तसेच धमकीवजा वक्तव्ये ही अत्यंत निषेधार्ह असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न आणि जनसामान्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडण्याचे काम ते प्रामाणिकपणे करत असतात. अशा परिस्थितीत पत्रकारांना धमकावणे, त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणे किंवा त्यांच्यात भीतीचे वातावरण तयार करणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे रोहा प्रेस क्लबच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

यावेळी आजच्या राजकारणात सभ्यता आणि सुसंस्कृतपणा जपला जाणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केले. पत्रकारांबाबत अवमानकारक भाषा वापरणाऱ्या व धमकी देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सादर केलेल्या निवेदनाद्वारे पत्रकारांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे, संबंधित वक्तव्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली असून, पत्रकारांच्या सन्मान व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी हा लढा सुरूच राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे, रायगड प्रेस क्लबचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, कार्याध्यक्ष सुहास खरीवले, सचिव रविंद्र कान्हेकर, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, अंजुम शेट्ये, मुख्य संघटक संदीप सरफळे, दीपक भगत, प्रसिद्धी प्रमुख नंदकुमार मरवडे, संतोष सातपुते, सागर जैन, उद्धव आव्हाड, महेंद्र मोरे, राकेश मोरे, भिवा पवार यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!