म्हसळा । वैभव कळस
म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील असुविधा आणि डॉक्टरांच्या कमतरतेबाबत शिवसेना (शिंदे गट) कमालीचा आक्रमक झाला आहे. रुग्णालयातील विस्कळीत कारभाराचा जाब विचारत, रिक्त पदे तात्काळ न भरल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने प्रशासनाला दिला आहे.
रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना पिण्याचे पाणीही उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णांचे हे हाल पाहून शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमित महामुणकर व माजी तालुकाप्रमुख प्रसाद बोर्ले चांगलेच आक्रमक झाले. या गंभीर समस्येवर अमित महामुणकर यांनी रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षकांना दूरध्वनीवरून (फोन) संपर्क साधला आणि रुग्णांसाठी तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. तसेच रुग्णालयातील रिक्त पदे भरून तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी केली. अन्यथा शिवसेनेच्या वतीने जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
शिकाऊ डॉक्टरांच्या भाषिक अडचणींमुळे रुग्ण हैराण
सर्वात महत्त्वाची आणि चिंताजनक बाब म्हणजे, सध्या म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दोन शिकाऊ (इंटर्न) डॉक्टर कार्यरत आहेत. मात्र, या डॉक्टरांना मराठी भाषा बोलता येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. रुग्णालयात येणारे बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील व खेड्यापाड्यातील असल्याने त्यांना आपल्या तक्रारी डॉक्टरांना सांगता येत नाहीत आणि डॉक्टरांचे बोलणे रुग्णांना समजत नाही. या भाषिक संवादहीनतेमुळे गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचे चित्र आहे.
या आंदोलनाप्रसंगी तालुक्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. आता या इशाऱ्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभाग काय पावले उचलणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
