दिघी | गणेश प्रभाळे
श्रीवर्धन तालुक्यातील वावेपंचतन येथे विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या एका ११ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २६) दुपारी घडली. जिगर हरिश्चंद्र ढापले (वय ११, रा. कुणबीवाडी, वावेपंचतन) असे मृत बालकाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण वावेपंचतन परिसरावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जिगर आणि त्याचा चुलत भाऊ संभव सागर ढापले हे दोघे दुपारी गावातील मंदिराजवळ खेळत होते. खेळत असतानाच ते दोघे जवळच असलेल्या एका विहिरीवर पोहण्यासाठी गेले. मात्र, विहिरीत पोहत असताना अचानक जिगरचा पाण्याचा अंदाज चुकल्याने त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडू लागला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून जिगरला पाण्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या संदर्भात दिघी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. अवघ्या ११ वर्षांच्या निष्पाप बालकाचा असा अचानक अंत झाल्याने ढापले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
