प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; कळंबुसरे-चिरनेरचे शेतकरी जनआंदोलनाच्या पवित्र्यात
उरण | अनंत नारंगीकर
शेतकऱ्यांचा पारंपरिक रहदारीचा रस्ता कोणीही अडवू शकत नाही, असा स्पष्ट निर्णय राज्य शासनाने घेतलेला असतानाही, उरणमधील ‘हिंद टर्मिनल’ कंपनीने या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. कंपनी व्यवस्थापनाने शेतजमिनीवर जाणाऱ्या पारंपरिक मार्गावर संरक्षण भिंत बांधल्याने कळंबुसरे आणि चिरनेर भागातील शेतकऱ्यांचा शेतावर जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून, पावसाळी पाण्याचा निचरा होणारे नैसर्गिक स्रोतही बुजले आहेत. या अन्यायाविरोधात उरण तहसील कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी आता जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.
नैसर्गिक पाण्याचा निचरा थांबला; पिकांचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, हिंद टर्मिनल या माल हाताळणी करणाऱ्या कंपनीने लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत उभारणी केली आहे. या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणारे नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत. याचा थेट फटका भातशेतीला बसत असून, परिसरात पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यातच २०२४-२५ या वर्षात कंपनीने शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मार्गावर संरक्षक भिंत उभी केली आहे.
यंत्रसामग्री नेण्यास अडथळा
सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू असून, कंपनीच्या भिंतीमुळे ट्रॅक्टर, पॉवरटिलर आणि इतर अवजारे शेतात नेणे अशक्य झाले आहे. यासंदर्भात शेतकरी अक्षय लक्ष्मण केणी व अन्य ग्रामस्थांनी २० मे २०२५ रोजी उरण तहसीलदारांना निवेदन दिले होते. तहसील कार्यालयाने जुने वहिवाटीचे मार्ग पूर्ववत करण्याचे आदेश कंपनीला दिले असूनही, कंपनीने ही भिंत हटवलेली नाही. उलट, शेतकऱ्यांना नाहक त्रास होईल अशीच भूमिका व्यवस्थापनाने घेतल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
“राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असले, तरी हिंद टर्मिनलसारख्या मुजोर कंपन्या त्यांना जुमानत नाहीत. प्रशासनाने ही भिंत तात्काळ हटवून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन छेडावे लागेल.”
— अक्षय केणी, स्थानिक शेतकरी.
या प्रकरणाकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक कानाडोळा केल्यास उरणमध्ये मोठा शेतकरी संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
