२ लाखांहून अधिक उमेदवारांना फटका; परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी पेपर फुटल्याने खळबळ
ठाणे (विशेष प्रतिनिधी)
देशभरात ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर थेट ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतून लीक झाल्याचे उघडकीस आले असून, यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. उद्या, २८ जून रोजी होणारी ही परीक्षा पेपर फुटल्यामुळे तातडीने रद्द करण्यात आली आहे.
सरकारच्या कडक तयारीला चोरट्यांचा सुरुंग
नुकत्याच झालेल्या ‘नीट’ पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर, टीईटी परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने आणि सरकारने संपूर्ण खबरदारी घेतली होती. परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मात्र, परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधीच भिवंडीतून पेपर लीक झाल्याची माहिती समोर आल्याने सरकारच्या या सर्व दाव्यांचे वाभाडे निघाले आहेत.
२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
या टीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास २ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. अनेक महिन्यांपासून रात्रं-दिवस अभ्यास करणाऱ्या या उमेदवारांचे भविष्य या पेपरफुटीमुळे पुन्हा एकदा टांगणीला लागले आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याचा निर्णय समजल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
हा पेपर नेमका कसा फुटला? यामागे कोणती टोळी सक्रिय आहे? याचा तपास आता पोलीस आणि शिक्षण विभागाकडून युद्धपातळीवर केला जात आहे. दरम्यान, ही परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आली असून, याबाबत लवकरच अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले जाईल आणि त्यामध्ये परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
