• Tue. Jun 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

​निधी मिळत नव्हता की खर्च केला नाही? ठाकरेंच्या फुटीर खासदारांचे ‘प्रगतीपुस्तक’ आले समोर!

ByEditor

Jun 23, 2026

विशेष प्रतिनिधी / मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड चर्चेत राहिलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी झाले आहे. ठाकरे गटाच्या सर्व ६ फुटीर खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. “आम्ही कुठलेही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी या पक्षप्रवेशाची घोषणा करत उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे. “हे खासदार आता खऱ्या शिवसेनेत आले आहेत,” असे म्हणत त्यांनी, २०२२ मध्ये शिवसेना वाचवण्यासाठी केलेल्या उठावाचा हा दुसरा टप्पा असल्याचे जाहीर केले.

​या ऐतिहासिक राजकीय भूकंपानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, सोशल मीडियावर मात्र एका वेगळ्याच आकडेवारीने खळबळ उडवून दिली आहे.

​निधी न मिळाल्याचा आरोप फोल? ‘एम्पॉवर्ड इंडिया’च्या आकडेवारीने वेधले लक्ष

​ठाकरे गट सोडताना या बंडखोर खासदारांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत, ‘विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता’ असा मुख्य आरोप केला होता. मात्र, ‘एम्पॉवर्ड इंडिया डॉट इन’ (Empowered India) या संकेतस्थळावरील खासदारांच्या निधी वापराची आकडेवारी आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, खासदारांचे दावे आणि प्रत्यक्ष आकडेवारी यात मोठी तफावत असल्याचे समोर येत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, या खासदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, मात्र त्यातील अत्यंत अल्प निधी खर्च झाल्याचे आणि अनेक कामे अपूर्ण असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

खासदारएकूण मंजूर निधीखर्च केलेला निधी (टक्केवारी)पूर्ण झालेली कामे (टक्केवारी)
१. ओमराजे निंबाळकर१८.५ कोटी रुपये१.९७ कोटी रुपये (१०.७%)१३० पैकी २१ (१३.९%)
२. नागेश पाटील आष्टीकर१९ कोटी रुपये५.०६ कोटी रुपये (२६.६%)७९ पैकी २८ (२६.२%)
३. भाऊसाहेब वाकचौरे१४.७ कोटी रुपये७१ लाख रुपये (४.९%)१३५ पैकी ०२ (१.५%)
४. संजय दिना पाटील१४.७ कोटी रुपये१५ लाख रुपये (१.१%)४० पैकी ०० (००%)
५. संजय देशमुख१८.०६ कोटी रुपये१.४२ कोटी रुपये (७.६%)१०६ पैकी ०७ (६.२%)
६. संजय जाधव१४.०७ कोटी रुपये३.७८ कोटी रुपये (२५.७%)५६ पैकी २५ (३०%)

सोशल मीडियावर नेटिझन्सचा सवाल

​”एकीकडे निधी मिळत नसल्याची तक्रार करायची आणि दुसरीकडे मिळालेला कोट्यवधींचा निधी तसाच पडून ठेवायचा, हा कुठला न्याय?” असा सवाल आता नेटिझन्सद्वारे उपस्थित केला जात आहे. विशेषतः संजय दिना पाटील यांनी १४.७ कोटींपैकी केवळ १५ लाख रुपये खर्च केले असून एकही काम पूर्ण केलेले नाही, तर भाऊसाहेब वाकचौरे यांनीही केवळ ४.९% निधी वापरला आहे.

​एकीकडे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करून शिंदेंनी ठाकरेंना मोठा धक्का दिला असला, तरी दुसरीकडे बंडखोर खासदारांच्या विकासकामांचा हा ‘प्रगतीपुस्तक’ समोर आल्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून आगामी काळात यावरून राज्यातील राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!