• Tue. Jun 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

​श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप! नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले करणार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

ByEditor

Jun 23, 2026

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘नंदनवन’वर सोहळा; दक्षिण रायगडच्या राजकीय समीकरणांना मोठा हादरा

​श्रीवर्धन | संदेश घोलप
दक्षिण रायगडच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत खळबळजनक आणि मोठी घडामोड समोर आली आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा अभ्यासू आणि प्रभावी नेते ॲड. अतुल अरविंद चौगुले हे आपल्या शेकडो निष्ठावंत कार्यकर्त्यांसह आज, मंगळवार (दि. २३ जून) रोजी शिवसेना (शिंदे गट) पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. मुंबईतील उपमुख्यमंत्री निवासस्थान ‘नंदनवन’ येथे हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार असून, यामुळे दक्षिण रायगडच्या राजकीय समीकरणांना मोठा हादरा बसला आहे.

​उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार स्वागत

​या भव्य सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहून ॲड. चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात जाहीर स्वागत करणार आहेत. याप्रवेळी रायगड लोकसभा संपर्क प्रमुख अनिल नवगणे, दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

​उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

​आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना घडलेल्या या नाट्यमय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे गटाला दक्षिण रायगडमध्ये मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. स्थानिक पातळीवर मजबूत संघटन असलेला मोठा गट शिवसेना (शिंदे गट) पक्षात सामील होत असल्याने येथील शक्तिसंतुलन पूर्णपणे बदलणार आहे.

“हा केवळ एक पक्षबदल नसून, श्रीवर्धन आणि परिसरातील स्थानिक राजकारणाला निर्णायक वळण देणारी घटना आहे. चौगुले यांच्या प्रवेशामुळे विरोधकांच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.”

​श्रीवर्धनमध्ये बदलणार राजकीय गणिते

​ॲड. अतुल चौगुले हे सुशिक्षित, कायद्याचे जाणकार आणि जनसामान्यांशी थेट नाळ असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पाठीशी असलेला मजबूत कार्यकर्ता वर्ग आणि युवकांमधील लोकप्रियता लक्षात घेता, या पक्षप्रवेशाचे दूरगामी परिणाम संपूर्ण तालुक्यावर आणि दक्षिण रायगडवर उमटणार आहेत.

​कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

​या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड परिसरातून शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. परिसरात जागोजागी स्वागत बॅनर झळकले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, दक्षिण रायगड आणि जिल्ह्यातील सर्व हितचिंतक व कार्यकर्त्यांनी ‘नंदनवन’ येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!