शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘मैत्री प्रतिष्ठान’ आणि शिवसेना धाटाव विभागाकडून महिलांना शिलाई मशीनचे वाटप
कोलाड । विश्वास निकम
“महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे ही काळाची गरज आहे. शिवसेना धाटाव विभाग प्रमुख निलेश वारंगे यांनी ग्रामीण भागातील गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून त्यांना हक्काचे स्वरोजगार साधन उपलब्ध करून दिले आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी निलेश वारंगे व मैत्री प्रतिष्ठानने सुरू केलेले सामाजिक कार्य अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नागोठणे जिल्हा परिषद सदस्य सुमित काते यांनी काढले.
रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक येथे शनिवार, दि. २० जून रोजी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना धाटाव विभागाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तालुक्यातील गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नागोठणे जिल्हा परिषद सदस्य सुमित काते उपस्थित होते.
महिलांच्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न
कार्यक्रमात बोलताना सुमित काते म्हणाले की, आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मात्र, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना योग्य संधी आणि साधनांची गरज असते. निलेश वारंगे यांनी ही गरज ओळखून सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या पंखांना बळ देण्याचे उत्तम काम केले आहे. या शिलाई मशीनमुळे अनेक महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील.
भविष्यात कौशल्य विकासाचे उपक्रम राबवणार: निलेश वारंगे
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शिवसेना धाटाव विभाग प्रमुख निलेश वारंगे म्हणाले की, शिवसेना धाटाव विभाग आणि मैत्री प्रतिष्ठान हे समाजातील वंचित व गरजू घटकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर राहिले आहे. महिलांनी आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भविष्यातही महिलांच्या प्रगतीसाठी विविध कौशल्य विकास उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे.
लाभार्थी महिलांनी मानले आभार
“शिलाई मशीन मिळाल्यामुळे आता आम्हाला घरबसल्या सन्मानाचा रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे आम्ही स्वावलंबी होऊ शकू,” अशा भावना लाभार्थी महिलांनी या प्रसंगी व्यक्त केल्या आणि धाटाव विभाग शिवसेना व निलेश वारंगे यांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाला तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे विविध पदाधिकारी, महिला आघाडीचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
