अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप; तक्रार मागे घेण्यासाठी राजकीय दबाव असल्याचा पीडितेचा दावा
कर्जत । गणेश पवार
नेरळ (कर्जत) परिसरात एका महिला डॉक्टरवर झालेल्या कथित अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नुकताच शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केलेल्या एका राजकीय पदाधिकाऱ्याविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सोशल मीडियावरील ओळखीचे रूपांतर अत्याचारात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर येथील पीडित महिला डॉक्टर आणि आरोपी राजेश महाडीक याची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने आधी पीडितेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये आरोपीने पीडितेस नेरळ येथील एका रिसॉर्टमध्ये नेले आणि तिथे लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
व्हिडिओ क्लिप आणि अंमली पदार्थांचा वापर
पीडितेने तक्रारीत अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत. आरोपीने केवळ लग्नाचे आमिष दाखवूनच वारंवार अत्याचार केला नाही, तर तिला गुंगीचे (नशेचे) पदार्थ दिल्याचाही आरोप आहे. या दरम्यान आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स तयार केल्या. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो सतत ब्लॅकमेल करत अत्याचार करत राहिला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न?
संशयित आरोपी राजेश महाडीक याने नुकताच सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला असून, तो एका माजी आमदाराचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. या राजकीय वजनाचा वापर करून हे गंभीर प्रकरण दडपण्यासाठी आणि तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेवर मोठा राजकीय दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक दावाही पीडित महिला डॉक्टरने केला आहे.
आरोपीला अटक, पोलीस तपास सुरू
राजकीय वलय आणि दबावाला न जुमानता पीडित महिलेने अखेर धाडसाने नेरळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करत आरोपी राजेश महाडीक याला बेड्या ठोकल्या आहेत. या हायप्रोफाइल प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास नेरळ पोलीस करत आहेत.
