लाचखोरीच्या कारवाईनंतर कार्यालय बंद; म्हसळा गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर ग्रामस्थांचा संताप
म्हसळा | वैभव कळस
भ्रष्टाचाराच्या कारवाईनंतर गेल्या काही दिवसांपासून कुलूपबंद असलेली खारगाव खुर्द सकलप ग्रामपंचायत तात्काळ कार्यान्वित करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ७ दिवसांत प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यास महिला मंडळासह सर्व ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा म्हसळा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
५ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रायगड विभागाने खारगाव खुर्द सकलप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि प्रशासक यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली होती. या कारवाईनंतर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लागले आहे. कार्यालय बंद असल्याने ग्रामस्थांची नागरी कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
ग्रामपंचायत कार्यालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी घेऊन ग्रामस्थ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) माधव जाधव यांना भेटले होते. मात्र, “हे माझ्या अधिकारात नाही” असे सांगून त्यांनी हात वर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालून गटविकास अधिकारी गावाला वेठीस धरत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी म्हसळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आणि प्रशासनाचा जाहीर निषेध केला.
ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याने दाखले मिळवणे, घरपट्टी भरणा करणे, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती यांसारखी महत्त्वाची कामे रखडली आहेत. “प्रशासकीय कारवाईमुळे कार्यालय बंद असेल, तर सामान्य जनतेने कामासाठी जायचे कुठे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
तहसीलदार श्रीमती आंबुर्ले यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या नावे हे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती महादेव पाटील, गाव अध्यक्ष बाळकृष्ण म्हात्रे, अली अध्यक्ष लक्ष्मण पाटील, रामभाऊ लोणशीकर, विश्वास खोत, चंद्रकांत कांबळे, नरेश मेंदडकर, बाळा म्हात्रे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आता ७ दिवसांच्या या अल्टिमेटमवर प्रशासन काय पावले उचलणार आणि ग्रामपंचायतीचे टाळे कधी उघडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
