म्हसळा | वैभव कळस
कोकणातील जागृत देवस्थान असलेल्या म्हसळ्याच्या श्री धावीरदेव महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त आज, ३१ मार्च रोजी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ‘पुढल्या वर्षीच्या’ यात्रेची पूर्वसंध्येला निघालेल्या या दिमाखदार सोहळ्याने संपूर्ण म्हसळा शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. उद्या, बुधवार १ एप्रिल २०२६ रोजी यात्रेचा मुख्य सोहळा पार पडणार आहे.
लेझीमचा ठेका आणि ‘खालू बाजा’चा नाद
सालाबादप्रमाणे याही वर्षी शिरसवणे (महाड) येथील प्रसिद्ध खालू बाजा पथकाच्या तालावर ही शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी महिलांनी मोठ्या उत्साहात लेझीम नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्री धावीर महाराज यांच्या पालखीची ही भव्य आणि दिव्य शोभायात्रा धावीरदेव मंदिर येथून सुरू होऊन संपूर्ण शहरातून मार्गस्थ झाली आणि पुन्हा मंदिर परिसरात विसर्जित झाली.

सर्वधर्मीय आणि सर्वसमाजाचा सहभाग
या शोभायात्रेत अबालवृद्धांपासून ते महिलांपर्यंत सर्व म्हसळावासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर यात्रेचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात एकतेचा आणि भक्तीचा संदेश देण्यात आला.
या सोहळ्याला हिंदू समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये समीर बनकर (अध्यक्ष, तालुका हिंदू समाज), अनिकेत पानसरे (नगराध्यक्ष), सुनील उमरोठकर (अध्यक्ष, सोनार समाज), सुनील अंजर्लेकर (अध्यक्ष, कुंभार समाज), दिलीप पानसारे (अध्यक्ष, पेटकर समाज), अमर करंबे (अध्यक्ष, शिंपी समाज), भालचंद्र करडे (अध्यक्ष, तांबट समाज), सुशील यादव (सेक्रेटरी, हिंदू समाज), संजय कर्णिक (माजी नगराध्यक्ष), राखी करंबे (नगरसेविका), धावीरदेव महाराज पुजारी म्हशीलकर बंधू, प्रसाद पोतदार, भालचंद्र दातार, अशोक काते, प्रसाद बोरकर, स्वप्निल चांदोरकर यांच्यासह अभय कळमकर, सुजित बोरकर, किरण पालांडे, प्रदीप कदम, अंकुश नटे व महिला मंडळाचे पदाधिकारी आणि संपूर्ण हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोभायात्रेमुळे यात्रेची मोठी जनजागृती झाली असून, उद्या १ एप्रिल रोजी होणाऱ्या मुख्य यात्रेसाठी प्रशासन आणि मंदिर समिती सज्ज झाली आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
