• Thu. Apr 9th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर; २८ एप्रिलला मतदान

ByEditor

Apr 9, 2026

माणगाव | सलीम शेख
राज्यातील ग्रामपंचायतींतील सदस्य व थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनहर्ता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या माणगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी हा कार्यक्रम जाहीर झाला असून, मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे.

या पोटनिवडणुकीत तालुक्यातील पळसप आणि टोळखूर्द या दोन ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. तर अंबर्ले, काकल, पहेल, हरकोल, विहूले, कुमशेत, शिरवली तर्फे निजामपूर, देगांव, वडवली, वणी, मलईकोंड, गांगवली, नांदवी आणि गोवेले या ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होईल. तसेच दहिवली तर्फे गोवेले ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या दोन जागांसाठी ही पोटनिवडणूक पार पडणार आहे.

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, तहसीलदार ३० मार्च २०२६ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. इच्छुक उमेदवारांना ७ एप्रिल ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील (११ व १२ एप्रिलच्या सुट्ट्या वगळून). अर्जांची छाननी १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असून, त्याच दिवशी दुपारी ३ नंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. २८ एप्रिल रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडेल आणि दुसऱ्याच दिवशी, २९ एप्रिल २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल. ६ मे २०२६ पर्यंत या निकालाची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!