उरण | घन:श्याम कडू
रायगड जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेत उरण नगरपरिषद प्रशासनाचा मनमानी आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) सारखी अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची कामे चक्क चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याने प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
तांत्रिक कामामुळे कर्मचाऱ्यांची कोंडी
BLO पदाचे काम हे प्रामुख्याने ऑनलाईन प्रणालीवर आधारित असून ते इंग्रजी भाषेत पूर्ण करावे लागते. अशा तांत्रिक कामासाठी विशेष कौशल्याची गरज असताना, तांत्रिक ज्ञान नसलेल्या वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. “आम्हाला इंग्रजी आणि ऑनलाईन प्रणालीचे पुरेसे ज्ञान नसताना हे काम देणे म्हणजे आमच्यावर अन्याय आहे,” अशी भावना कर्मचारी विजय पवार यांनी व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमांना हरताळ
शासकीय नियम आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हे काम प्रामुख्याने तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांकडून करून घेणे अपेक्षित आहे. मात्र, उरण प्रशासनाने या नियमांना धाब्यावर बसवून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर हे काम लादले आहे. प्रशासनाचा हा प्रकार केवळ नियमभंग नसून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेलाच धोक्यात टाकणारा असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
१९ कर्मचाऱ्यांचे सामूहिक निवेदन
प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात उरण नगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर तब्बल १९ कर्मचाऱ्यांच्या सह्या असून, त्यांनी या कामावर बहिष्कार टाकण्याचे संकेत दिले आहेत.
आता या तीव्र विरोधानंतर प्रशासन आपल्या निर्णयात बदल करणार की कर्मचाऱ्यांचा असंतोष अधिक भडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उरणमध्ये या प्रकरणावरून आगामी काळात मोठा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
