• Fri. Apr 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे महावितरणचा ‘अंधेर नगरी चौपट राजा’ कारभार!

ByEditor

Apr 10, 2026

कडाक्याच्या उन्हात तासनतास वीज गुल; महावितरणच्या कारभारावर संताप

नागोठणे | विशेष प्रतिनिधी
नागोठणे शहर आणि परिसरात महावितरणने अक्षरशः उच्छाद मांडला असून विजेचा ‘खेळखंडोबा’ आता नागरिकांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. तांत्रिक बिघाडाचे तेच तेच रटाळवाणे कारण सांगून तासनतास वीज गुल ठेवणाऱ्या महावितरणच्या मुजोरीमुळे जनतेमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. “बिले वसुलीत वाघ असणारे अधिकारी सेवा देण्यात मात्र ढिम्म का?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

​गेल्या आठवड्याभरापासून नागोठण्यात अघोषित भारनियमनाने कळस गाठला आहे. रखरखत्या उन्हात घाम गाळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी, महावितरणकडून दिवसातून दहावेळा वीज खंडित केली जात आहे. रात्रीच्या वेळी तर वीज कधी येईल आणि कधी जाईल याचा नेम उरलेला नाही. महावितरणच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांची रात्र वैऱ्याची ठरत आहे.

नागोठण्यात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दिवसातून अनेकदा वीज खंडित केली जात आहे. रात्रीच्या वेळीही वीज जात असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत. “उन्हाचा पारा ४० अंशांच्या पार असताना वीज जाणे म्हणजे सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे,” अशी भावना स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत.

विजेच्या खेळखंडोब्यामुळे पाणीपुरवठा योजनांवरही परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका स्थानिक व्यापाऱ्यांनाही बसत आहे. महावितरणच्या या गलथान कारभारामुळे नागोठण्यातील उद्योगधंदे, शिक्षण आणि सामान्य जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे.

नागोठणेकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे थांबवा. खुर्च्या उबवणाऱ्या अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे, अन्यथा जनतेच्या रोषाचा सामना करावा लागण्याची वेळ महावितरणवर येणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!