• Fri. Apr 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावात अवैध खैर लाकूड वाहतूकीचा पर्दाफाश!

ByEditor

Apr 10, 2026

वनविभागाची कारवाई; मुंबई-गोवा महामार्गावर १८.६९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

माणगाव । सलीम शेख
माणगाव तालुक्यात वनविभागाने अवैध लाकूड तस्करीविरोधात मोठी मोहीम उघडली असून, मुंबई-गोवा महामार्गावर सोलीव खैर लाकडाची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे १८ लाख ६९ हजार ३०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, वनविभागाच्या पथकाने बुधवारी (दि. ८ एप्रिल) रात्री ८:१९ वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील विघवली येथे सापळा रचला होता. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरून जाणारा संशयास्पद टाटा १९१६ टेम्पो (क्र. DD 01 AC 9590) थांबवून त्याची झडती घेण्यात आली.

तपासणीदरम्यान, कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय सुमारे ११.४०० घनमीटर सोलीव खैर लाकूड वाहून नेले जात असल्याचे उघड झाले. वनविभागाने ६९,३०९ रुपये किमतीचे लाकूड आणि १८ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण १८,६९,३०९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी वाहन चालक नदीम अहमद (रा. वापी, जि. वलसाड, गुजरात) याच्यावर भारतीय वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हे लाकूड कोठून आणले आणि कोठे नेले जात होते, याचा अधिक तपास आता वनविभाग करत आहे.

जप्त मुद्देमाल: १८,६९,३०९ रुपये (टेम्पोसह).

लाकडाचे प्रमाण: ११.४०० घनमीटर सोलीव खैर.

कारवाईचे ठिकाण: विघवली, माणगाव (मुंबई-गोवा महामार्ग).

ही कारवाई रोहा उपवनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव व सहाय्यक वनसंरक्षक श्री. पांढरकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये दक्षता पथक ठाणेचे विभागीय अधिकारी रोशन राठोड, वनक्षेत्रपाल विकास भामरे आणि माणगाव वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांच्या सूचनेनुसार पथकाने सहभाग घेतला. या मोहिमेत इंदापूर वनपाल सुजित राजमाने, कुशेडे वनरक्षक अजिंक्य कदम, वन मजूर विठ्ठल दिघे व विवेक जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!