रेवदंडा | सचिन मयेकर
अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नववीतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकाविरोधात ‘POCSO’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता नववीत शिकणारी ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी स्कूल व्हॅनने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान संबंधित नराधम चालकाने तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. या धक्कादायक प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने घरी परतल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. आपल्या पाल्यासोबत घडलेला हा प्रकार ऐकून पालकांनी तात्काळ मांडवा सागरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
मांडवा पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शाळा प्रशासन आणि शालेय वाहतूक व्यवस्थेवर पोलिसांनी कडक नियंत्रण ठेवावे, अशी मागणी संतप्त पालकांकडून केली जात आहे.
