उरण नगरपालिकेकडे सर्वाधिक ४२ कोटींची थकबाकी; एमआयडीसीची कठोर कारवाई
अनंत नारंगीकर
उरण : उरण तालुक्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिकेकडे पाणी बिलाची तब्बल ७६ कोटी ९४ लाख ९३ हजार ९८० रुपयांची अवाढव्य थकबाकी साचली आहे. एमआयडीसीने वारंवार नोटिसा देऊनही या थकबाकीचा भरणा न झाल्याने अखेर कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. तालुक्यातील २० पैकी ८ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित केला असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता ज्ञानदेव सोनावणे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरण नगरपालिकेकडे सर्वाधिक ४२ कोटी ७५ लाख ५ हजार २३१ रुपयांची थकबाकी असून यामध्ये पाणी बिल, मंजूर कोट्यापेक्षा जास्त वापरलेला दंड आणि विलंब शुल्काचा (DPC) समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या बाबतीतही परिस्थिती गंभीर असून, सध्या सुरू असलेल्या जोडण्यांपैकी १२ ग्रामपंचायतींकडे २७.५७ कोटी रुपये थकीत आहेत. तर ज्या ८ ग्रामपंचायतींची जोडणी कापण्यात आली आहे, त्यांच्याकडे सुमारे ६.६२ कोटी रुपये थकीत आहेत.
प्रमुख थकबाकीदार ग्रामपंचायतींमध्ये चाणजे (११.१९ कोटी), फुंडे (३.८५ कोटी), जसखार (२.८५ कोटी), चिरले (२.६७ कोटी), धुतुम (१.६९ कोटी) आणि करळ (१.१७ कोटी) यांचा समावेश आहे. थकबाकी न भरल्यामुळे एमआयडीसीने दिघोडे, दादरपाडा, वेश्वी, पागोटे, चिरनेर, रंजनपाडा, नवघर आणि खोपटा या ८ ग्रामपंचायतींची पाणी जोडणी कापली आहे.
विशेष म्हणजे, अनेक ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही आणि नागरिकांकडून नियमित पाणीपट्टी वसूल करूनही एमआयडीसीचे बिल का भरत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. मार्च २०२६ अखेरची ही आकडेवारी प्रशासकीय चिंतेचा विषय बनली आहे.
“आम्ही ठरवून दिलेल्या कोट्यानुसार पाणीपुरवठा करत आहोत, मात्र थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने यंत्रणा चालवणे आणि नवीन विकासकामे करणे अशक्य झाले आहे. शासकीय निधीतून वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत, पण त्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे.”
— ज्ञानदेव सोनावणे, उपअभियंता, एमआयडीसी
