• Fri. Apr 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा द्या; प्रवासी संघटनेचे रेल्वे प्रशासनाला साकडे

ByEditor

Apr 17, 2026

विविध मागण्यांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांना निवेदन सादर

नागोठणे (प्रतिनिधी): नागोठणे आणि परिसरातील सुमारे १०४ गावांतील प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ‘नागोठणे प्रवासी संघटने’ने कंबर कसली आहे. दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेससह अन्य महत्त्वाच्या गाड्यांना नागोठणे स्थानकावर थांबा मिळावा आणि रेल्वे सुविधांचा विस्तार व्हावा, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांना (CSMT, मुंबई) नुकतेच निवेदन देण्यात आले.

या निवेदनाद्वारे संघटनेने रेल्वे प्रशासनाचे लक्ष नागोठणे परिसरातील ज्वलंत प्रश्नांकडे वेधले आहे. सद्यस्थितीत रोहा आणि दिवा दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते, ज्यामुळे स्थानिक प्रवाशांना, विशेषतः नोकरदार आणि विद्यार्थ्यांना प्रवास करणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

दिवा-सावंतवाडी-दिवा पॅसेंजर (१०१०५/१०१०६): या गाडीला कोरोना काळापूर्वी नागोठणे स्थानकावर थांबा होता, जो नंतर बंद करण्यात आला. हा थांबा तातडीने पूर्ववत करावा.

गणपती व हॉलिडे स्पेशल गाड्या: सणासुदीच्या काळात धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांना नागोठणे स्थानकावर थांबा देण्यात यावा.

गाड्यांचा विस्तार: ६९०१९ – ६९०२० दिवा-पे-दिवा गाडीचा विस्तार नागोठणे स्थानकापर्यंत करण्यात यावा.

प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे: प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ ची उंची कमी असल्याने प्रवाशांना चढण्या-उतरण्यात मोठा अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मची उंची त्वरित वाढवण्यात यावी.

आरक्षण सुविधा: नागोठणे स्थानकावर प्रवाशांसाठी आरक्षित तिकीट मिळण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

नागोठणे विभागातील रेल्वे सेवेला ४० वर्षे पूर्ण झाली असली तरी अद्याप फेऱ्यांमध्ये पुरेशी वाढ झालेली नाही. दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ही ‘कोंडी’ फोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी नागोठणे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, रेल्वे प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे आता सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!