• Fri. Apr 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण नगरपालिकेत ‘सत्तेचा खेळ’, विकास कोलमडला; भाजपच्या बहुमतापुढे सत्ताधारी हतबल

ByEditor

Apr 17, 2026

अत्यावश्यक नागरी कामांचे ठराव नामंजूर | सत्ताधारी-विरोधकांत राजकीय ठिणगी | पावसाळ्यापूर्वीची कामे रखडल्याने उरणकरांमध्ये संताप

उरण | घन:श्याम कडू
उरण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पालिका सभागृहात पार पडली. ही सभा वरवर शांततेत दिसत असली, तरी सभागृहात राजकीय संघर्षाची जोरदार ठिणगी पडली. भाजपच्या नगरसेवकांनी आपल्या बहुमताच्या जोरावर सत्ताधारी महाविकास आघाडीला कोंडीत पकडत नागरी सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाचे ठराव नामंजूर केले. या राजकीय पेचप्रसंगामुळे उरणमधील विकासकामे पुन्हा एकदा राजकारणाच्या बळी पडल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

बहुमताची ताकद विरुद्ध नगराध्यक्ष पद

डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असल्या, तरी सभागृहात भाजपचे १२ नगरसेवक असल्याने संख्याबळ त्यांच्या बाजूने आहे. सत्तेची सूत्रे एका गटाकडे आणि बहुमताची ताकद दुसऱ्या गटाकडे, अशा विसंगतीत नगरपरिषदेचा कारभार अडकला आहे. याची प्रचिती शुक्रवारी प्रत्येक ठरावावर झालेल्या मतदानावेळी आली, जिथे १० विरुद्ध १२ अशा फरकाने विकासकामांना ब्रेक लावण्यात आला.

पावसाळ्यापूर्वीच्या कामांनाच विरोध

पावसाळा तोंडावर असताना शहरासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या कामांचे ठराव सभेत मांडण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने:

  • पाणीपुरवठा टाक्यांची स्वच्छता.
  • बोरी गावातील रस्त्यांची दुरुस्ती.
  • मुख्य नाल्यालगत सुरक्षा भिंत आणि गटार दुरुस्ती.
  • स्मशानभूमी सुशोभीकरण.
  • अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक बसवणे.

मात्र, विरोधकांनी निधीअभावाचे कारण पुढे करत या सर्व कामांना विरोध दर्शवला. नगरसेवक अतुल ठाकूर, प्रमिला पवार आणि स्वीकृत सदस्य गणेश शिंदे यांनी ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले, परंतु विरोधकांच्या एकजुटीपुढे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि सुरक्षा भिंतीची कामे न झाल्यास शहरात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तरीही राजकारणामुळे मूलभूत गरजांकडे डोळेझाक केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, ज्या प्रभागांत अनेक वर्षांपासून विकासकामे रखडली आहेत, तिथले लोकप्रतिनिधीच आता निधीचे कारण देत कामांना विरोध करत आहेत. या अन्यायाविरोधात आता जनतेनेच रस्त्यावर उतरावे, अशी भावना उरणकरांमधून व्यक्त होत आहे.

“राजकारण आणि नागरिकांचे प्रश्न यांची गल्लत करू नये. पावसाळ्यापूर्वीची कामे थांबवणे म्हणजे थेट जनतेवर अन्याय आहे. बहुमताचा असा वापर करून विकास रोखणे दुर्दैवी आहे.” — भावना घाणेकर, नगराध्यक्षा, उरण

उरण नगरपरिषदेतील हा सत्तेचा संघर्ष लोकशाही बळकट करणारा आहे की विकासाचा गळा घोटणारा? असा जळजळीत सवाल आता सामान्य जनता विचारत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!