घन:श्याम कडू
उरण : उरणच्या खोपटा पुलाच्या बाजूने जाणाऱ्या एचपी म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियमच्या इंधन वाहू वाहिनीला कुणीतरी अज्ञातांनी छिद्र पाडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जमिनीत खोलवर असलेल्या या वाहिनीला डिझेल (तेल) माफियांनी तर असे छिद्र पाडून त्यातून इंधन चोरण्याचा प्रयत्न झालास नाही ना असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे.
मागील तीन दिवसांपासून या तेल वाहिनीचे छिद्र बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे याकरिता तीन अग्निशमन दलाच्या गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एच पी कंपनीचे अनेक कामगार या ठिकाणी रात्रंदिवस काम करीत असल्याचे दिसून आले आहे. काही वर्षांपूर्वी आयओटीएलच्या पाईपलाईनला देखील पागोटे पुलाखाली अशाच प्रकारे छिद्र पाडून त्याला एक छोटा पाईप जोडून त्याद्वारे इंधनाची चोरी केली जात असल्याचे प्रकरण घडले होते. त्यानंतर आत्ता पुन्हा एकदा खोपटा पुला खाली एच पी च्या इंधन वाहिनीला छिद्र पाडण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे उरण तालुका परिसरात तेल माफिया पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत की काय असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे.
