• Sat. Apr 25th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

लोणेरे हत्याकांड: पोलिसांच्या आश्वासनानंतर जन-आक्रोश मोर्चा स्थगित

ByEditor

Apr 25, 2026

आरोपींच्या अटकेसाठी प्रशासनाला ३० एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम

माणगाव । सलीम शेख
लोणेरे येथील लॉजवर झालेल्या तरुणीच्या निर्घृण हत्याकांडातील आरोपी अजूनही मोकाट असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज, २५ एप्रिल रोजी गोरेगाव येथे ‘जन-आक्रोश मोर्चा’ आणि बंदचे आयोजन केले होते. मात्र, रायगड पोलीस प्रशासनाने पुढील दोन दिवसांत आरोपींना जेरबंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर, सर्वपक्षीय कृती समितीने सहकार्याची भूमिका घेत हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

आज गोरेगाव येथे सर्वपक्षीय नेत्यांची आणि नागरिक-कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थितांनी पोलीस तपासाच्या संथ गतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रायगड पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. तपासासाठी थोडा अतिरिक्त कालावधी मिळावा, अशी विनंती प्रशासनाने केली. त्यानंतर, जनभावनेचा आदर करत आणि पोलिसांना सहकार्य म्हणून आंदोलकांनी मोर्चेबंदी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

शिवसेना (शिंदे गट) नेते अरुण चाळके आणि शिवसेना (उबाठा गट) नेते नरेश अहिरे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, “आम्ही पोलिसांना तपासासाठी ३० एप्रिलपर्यंत अंतिम मुदत (अल्टिमेटम) दिली आहे. जर या कालावधीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या नाहीत, तर २ मे रोजी गोरगाव व लोणेरे परिसरात पूर्ण बंद पाळून तीव्र जन-आक्रोश मोर्चा काढण्यात येईल.”

या बैठकीत शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, विकास गायकवाड, रवी मोरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. बैठकीत आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.

सध्या या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास किती जलदगतीने पूर्ण करतात आणि दिलेल्या मुदतीत आरोपींना अटक करतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!