• Sat. Apr 25th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटी चालकाचा मृत्यू

ByEditor

Apr 25, 2026

माणगाव जवळील गारळ गावच्या हद्दीतील घटना; चालक फरार

माणगाव । सलीम शेख
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गारळ गावच्या हद्दीत विहान हॉटेलसमोर शनिवारी पहाटे एका भरधाव अज्ञात वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्कुटी चालक ज्ञानेश्वर नथुराम लहाने (५०, रा. गारळ) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर लहाने हे शनिवारी (२५ एप्रिल) पहाटे १:३० वाजण्याच्या सुमारास आपली स्कुटी (क्रमांक एम.एच.०६ बी.एल.५४८९) घेऊन मुंबईकडून गोवा दिशेने महामार्गावरून गारळ गावाकडे जात होते. यावेळी गोवा बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, लहाने यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

याप्रकरणी योगेश चंद्रकांत लहाने (२९, रा. गारळ) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ अन्वये केली असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चिकणे या अपघाताचा अधिक तपास करत असून, फरार चालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!