राज ठाकरेंचे ‘मिशन २०२९’; कार्यकर्त्यांना मिळणार उभारी, तालुकानिहाय घेणार आढावा
धाटाव । शशिकांत मोरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी कंबर कसली असून, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी नव्याने संपर्क अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आलेले नेते संदीप देशपांडे, सरचिटणीस योगेश परुळेकर आणि राजेश येरुणकर हे दि. २८ आणि २९ एप्रिल रोजी श्रीवर्धन विधानसभा क्षेत्राचा तालुकानिहाय दौरा करणार आहेत.
‘राज’दूत मैदानात: महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश
२०२९ च्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रायगड जिल्ह्यातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी सक्त आदेश दिले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून महिनाभरात वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना नियुक्ती पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. पक्षात नव्याने येण्यास इच्छुकांना सामावून घेणे, जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि पक्ष सोडून गेलेल्यांची कारणमीमांसा शोधणे हे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
स्थानिक प्रश्नांवर मनसे आक्रमक होणार
सत्ताधारी पक्षांमधील वर्चस्वाच्या लढाईत रायगड जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प, योजनांचा झालेला खेळखंडोबा, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभार यावर ‘मनसे स्टाईल’ने वाचा फोडण्याचे नियोजन या दौऱ्यात केले जाणार आहे. मतदारांच्या मनात स्थान निर्माण करून पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे.
मंगळवार, दि. २८ व बुधवार २९ एप्रिल २०२६ रोजी श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा आणि माणगाव तालुका निहाय दौरा आखण्यात आला आहे. सदर दौऱ्यात स्थानिक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटून जिल्ह्यातील पक्षाच्या संघटनात्मक परिस्थितीचा आढावा योगेश परुळेकर आणि राजेश येरुणकर घेणार आहेत..
पदाधिकाऱ्यांना ‘नो एक्सक्यूज’
येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकतीने लढवण्यासाठी चोख मोर्चेबांधणी करण्याबाबत या बैठकांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असून कोणतीही सबब चालणार नाही, अशा परखड सूचना आधीच देण्यात आल्या आहेत.
