आधुनिकतेच्या धावपळीत पारंपरिक पत्रावळ्या आणि द्रोण इतिहासजमा; थर्माकोलचा वापर वाढला
धाटाव । शशिकांत मोरे
सध्या लग्नघाईचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र, एकेकाळी जेवणावळींची शोभा वाढवणाऱ्या पळस, कुडा आणि मोहाच्या पानांच्या पत्रावळ्या आता इतिहासात जमा होताना दिसत आहेत. आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करताना ‘बफे’ सिस्टिम आणि प्लास्टिक-थर्माकोलच्या ताटांनी पारंपरिक पत्रावळ्यांची जागा घेतली असून, आरोग्यासोबतच पर्यावरणाचाही मोठा खेळखंडोबा सुरू आहे.
सेवाभाव गेला अन् ‘बफे’ आला!
पूर्वी ग्रामीण भागात लग्न किंवा मोठे समारंभ असले की, शेजारी-पाजारी विनामूल्य जंगलातून पाने आणून रात्री एकत्र बसून पत्रावळ्या टोचत असत. यातून सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपला जायचा. आता मात्र धावपळीच्या काळात तासन् तास चालणाऱ्या पंगती मागे पडल्या आणि ‘बफे’ पद्धत रूढ झाली. उभे राहून जेवण्याच्या या पद्धतीत हाताळायला हलक्या असणाऱ्या कागदी किंवा थर्माकोलच्या ताटांना पसंती दिली जात आहे.
आयुर्वेदाचा वारसा विसरलो
हजारो वर्षांपासून पत्रावळीवर जेवण्याचे महत्त्व आयुर्वेदानेही मान्य केले आहे. लिंबाच्या किंवा बांबूच्या काड्यांनी तयार केलेली पत्रावळ ही पूर्णतः नैसर्गिक आणि आरोग्यवर्धक असायची. आजही केवळ देवाचा नैवेद्य मांडण्यापुरत्याच पत्रावळ्या शिल्लक राहिल्या आहेत. २०१८ पासून शासनाने प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी घातली असली, तरी कागदोपत्री असलेल्या या बंदीचा लग्नसराईत फज्जा उडाल्याचे विदारक चित्र आहे.
लघुउद्योगावर उपासमारीची वेळ
पत्रावळी बनवणे हा जंगलालगतच्या गावातील महिलांसाठी आणि गरीब कुटुंबांसाठी मोठा आधार होता. कमी भांडवलात घरच्या घरी चालणारा हा लघुउद्योग आता शेवटच्या घटका मोजत आहे. ताटांची जागा स्टील आणि प्लास्टिकने घेतल्याने या कारागीर कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पर्यावरणाची हानी: पत्रावळी जेवणानंतर जमिनीवर टाकल्या तरी त्याचे खत होते. मात्र, आज वापरावे लागणारे थर्माकोल आणि प्लास्टिक वर्षानुवर्षे कुजत नाही. परिणामी, मंगल कार्यालयांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग साचून पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.
थोडक्यात सांगायचे तर, सोयीच्या नावाखाली आपण निसर्गापासून दूर जात आहोत. जर वेळीच पुन्हा पारंपरिक पत्रावळ्यांकडे वळलो नाही, तर येणाऱ्या पिढीला पळसाची पाने केवळ पुस्तकातच पाहावी लागतील.
